पाली, पाटणूस भिरा मार्गावर अनियमित एसटी बस सेवा
शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे होतात प्रचंड हाल
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
सकाळी 6 वा. पालीतून सुटणारी पाली भिरा एसटी. व भिरा येथून स.7वा. पालीकडे मघारी फिरणारी भिरा पाली एसटी बस भिरा पाली मुंबई व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी.
माणगाव तालुक्यातील पाटणूस भिरा करिता सुधागड तालुक्यातील पाली येथून दिवस भरात एस टी बसच्या सात आठ फेऱ्या होतात. भिरा पाटणूस ते पाली या दरम्यान 20ते 25गावे येतात त्यामुळे या भागात प्रवासी वर्ग फार मोठा आहे. शिवाय या भागातून पाली येथे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. असे असतानाही काही काही वेळेला पाली आगार व्यवस्थापक अचानक एसटी बस रद्द करतात त्यामुळे एसटी पासवर पूर्ण अवलंबून असणाऱ्या आणि खाजगी वाहनांचे भाडे परवडत नसणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवस भर एसटी बसची प्रतीक्षा करावी लागते. आणि मग दिवसभर प्रतीक्षा करूनही एसटी आलीच नाही तर खिश्यात पैसे नसल्याने विद्यार्थी पायी प्रवास करतात जे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे एखादी बस नादुरुस्त झाली तर आगार प्रमुखांनी बसची पर्याई व्यवस्था केली पाहिजे परंतु असे होताना कधीच दिसत नाही. आमच्या कडे जादा एसटी बस नाही, ड्रायवर नाही, बस वाहक नाही. अशी सबब सांगितली जाते. सोमवार ते शुक्रवार या एसटी बस जरी (नादुरुस्त एसटी बस वगळता) नियमित सुरू राहिल्या तरी शनिवार रविवार दिवस भरात फक्त दोनच एसटी बस या मार्गांवर धावतात. आगार प्रमुखांना या बाबत विचारणा केली तर शाळा कॉलेजला सुट्टी असल्याचे ते कारण पुढे करतात परंतु शाळा कॉलेजला जरी सुट्टी असली तरी बरेच विद्यार्थी क्लास ला सुध्दा जाणारे असतात शिवाय पाली बाजार पेठेत खरेदीला जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या काही कमी नाही त्यामुळे शनिवार रविवार जरी शाळा कॉलेजला सुट्टी असली तरी आगार प्रमुखांनी या एसटी बस रद्द करू नयेत अशी या परिसरातील प्रवाशांची प्रमुख मागणी आहे.
गेली 40 वर्ष सकाळी 6 वा. पाली आगारातून सुटणारी पाली भिरा एसटी. व भिरा येथून पालीला परतणारी भिरा पाली एसटी ही भिरा पाली मुंबई व्हावी अशी देखील या परिसरातील प्रवाशांची प्रमुख मागणी आहे याचाही आगार प्रमुखांनी जरूर विचार करावा. भिरा पाटणूस ते पाली या दरम्यान खूप मोठा प्रवाशी वर्ग असल्याने ही बस सुरू केल्यास प्रवाश्यांचा चांगला प्रसतिसाद मिळेल.