कोलाडमध्ये काही दिवस थंडावलेला मटका पुन्हा जोमात!
कोलाड पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष; नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
महिला वर्ग आक्रमक
कोलाड-रायगड, दि. २९ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात काही काळ बंद असलेला बेकायदेशीर मटका जुगार आता पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला असून मटका माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरीच्या काळात काही दिवस हा अवैध धंदा पूर्णपणे थंडावल्याचे चित्र होते; मात्र मटका चालकांनी आपले लागेबांधे वापरून हा गोरखधंदा पुन्हा जोमात सुरू केला असून स्थानिक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. बंद पडलेला मटका जुगार अचानक पुन्हा कसा काय सुरू झाला, असा संतापजनक सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड पोलीस ठाण्यात नव्याने पदभार सांभाळणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांचे संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही, हेच या वाढत्या अवैध अड्ड्यांवरून सिद्ध होत आहे. नवीन अधिकारी आल्यानंतर या बेकायदेशीर प्रवृत्तींना आळा बसेल अशी अपेक्षा होती, परंतु काही दिवस बंद असलेला मटका पुन्हा बिनधास्त सुरू झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मटका अड्ड्यांवरून पोलिसांपर्यंत नियमित हफ्ते व्यवस्थित पोहोचत असल्यामुळेच खाकी वर्दीने याकडे जाणूनबुजून काणाडोळा केल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे. या बेकायदा जुगारामुळे पोलिसांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाली असून त्यांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे नागरिक उघडपणे बोलत आहेत.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झालेल्या या जुगाराच्या विळख्यात रोजंदारीवर जगणारे कष्टकरी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर ओढले जात आहेत. कष्टाने कमावलेला पैसा या मटक्यात उधळला जात असल्याने अनेक गरिबांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. घराघरांत आर्थिक चणचण आणि भांडणे वाढल्याने या भागातील महिला वर्ग कमालीचा संतप्त झाला आहे. काही दिवस बंद ठेवून जनतेचे लक्ष विचलित करायचे आणि पुन्हा तेच काळे धंदे मांडायचे, हा मटका माफियांचा डाव पोलिसांच्या आशीर्वादानेच यशस्वी होत असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने कोणतीही हयगय न करता तात्काळ धडक कारवाई करून हा अवैध मटका जुगार कायमस्वरूपी बंद करावा, अशी आक्रमक मागणी कोलाड परिसरातील नागरिक आणि महिला वर्गाकडून आता लावून धरली जात आहे.

Comments
Post a Comment