रोह्यात राष्ट्रवादी आणि भाजपला मोठा धक्का!
म्हसकर, मगर, आप्पा देशमुख, डी. बी. पाटील यांच्यासह शेकडोंचा शिवसेनेत प्रवेश!
“तुम्हाला सोडून लोक का चाललेत, याचा विचार करा!” – पालकमंत्री भरत गोगावले यांचा तटकरेंना नाव न घेता टोला; “रायगड बदलतोय, रोहा आता बोलतोय!” - आमदार महेंद्र दळवी यांचा एल्गार
रोहा-रायगड, दि. १८ (प्रतिनिधी) :- रोह्याच्या राजकीय पटावर मोठी उलथापालथ घडवत राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे पेण विधानसभा अध्यक्ष प्रमोद म्हसकर, विद्यमान पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख, भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. बी. पाटील, कुणबी समाज रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. रोहा शहरातील श्रीराम मारुती चौकात हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विराट पक्षप्रवेश सोहळ्याने रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात पालकमंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. “माणसाचे घर छोटे असले तरी मन मोठे असावे लागते. आज शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. लोक आपल्याला सोडून का चालले आहेत, याचा आत्मपरीक्षण करून विचार करा,” असा खोचक सल्ला त्यांनी दिला. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला भविष्यात योग्य संधी आणि सन्मान दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
आमदार महेंद्र दळवींचा तटकरेंवर घणाघात!
आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या आक्रमक भाषणातून राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर टीकेची तोफ डागली. “रायगड बदलतोय, रोहा आता बोलायला लागला आहे,” असे सांगत त्यांनी रोह्यातील राजकीय बदलाचे संकेत दिले. पुण्यात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षातील अनेक प्रमुख नेते अनुपस्थित असल्याचा उल्लेख करत राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याचा दावा त्यांनी केला.
“तटकरेंचे शंभर अपराध पूर्ण झाले आहेत. यापुढेही तटकरे कुटुंबाला बाजूला ठेवून महायुती हाच आमचा पॅटर्न राहील,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. नगरपालिका निवडणुकीत आमचाच एक मच्छर गद्दार निघाला, त्याला पुन्हा पक्षात घेऊ नका, असे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांना सांगितल्याचा गौप्यस्फोटही दळवी यांनी केला. त्यांच्या या विधानाने सभास्थळी राजकीय चर्चांना उधाण आले.
रोह्याच्या बेरोजगारीपासून प्रदूषित कुंडलिकेपर्यंत प्रश्नांचा पाढा!
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रमोद म्हसकर यांनी रोहा तालुक्यातील विकासाच्या प्रश्नांना थेट हात घातला. महाडमध्ये औद्योगिक विकासाने मोठी झेप घेतली असताना रोहा मात्र अद्याप विकासाच्या बाबतीत मागे राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्थानिक तरुणांना अपेक्षित रोजगार उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सांडपाण्यामुळे प्रदूषित होत असलेली कुंडलिका नदी या ज्वलंत समस्यांकडे त्यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. या प्रश्नांमध्ये पालकमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून रोह्याला न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
दिग्गजांची मांदियाळी; हजारोंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन!
या विराट पक्षप्रवेश सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा संपर्कप्रमुख अनिल नवगवणे, विजयराज खुळे, दर्शन विचारे, रोहा तालुकाप्रमुख उद्देश वाडकर, तालुका संपर्कप्रमुख संदेश मोरे, शहरप्रमुख प्रकाश कोळी, अशोक धोत्रे, सुरेश महबळे, चंद्रकांत लोखंडे, अमित उकडे, निलेश वारंगे, संतोष खटावकर, संतोष खेरटकर, संतोष पोटफोडे, सतेज आपणकर, मंगेश रावकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोह्यातील या पक्षप्रवेशाने केवळ राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीला धक्का बसला असे नाही, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेतही मिळाले आहेत. आता या राजकीय भूकंपाचे पडसाद रायगडच्या राजकारणात किती दूरवर उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments
Post a Comment