ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा

रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना

श्री धावीर महाराजांच्या सशस्त्र पोलीस मानवंदनेची ऐतिहासिक परंपरा पुन्हा सुरू करण्यात तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार आणि राज्यमंत्री बी. एल. पाटील यांचे योगदान मोलाचे!

रोहेकरांच्या अस्मितेचा हा गौरवशाली वारसा जपणाऱ्या या दोन्ही महानुभावांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ऐतिहासिक बातमी अवश्य वाचा!

 देवस्थानचा १६५ वा नवरात्रोत्सव 

रोहा, दि. २२ ऑक्टो. (संदीप सरफळे) :-  रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास शुक्रवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. यावेळी शासनाच्या वतीने रोहा पोलिस निरीक्षक अभय शेलार व पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात अलोट गर्दी झाली होती, 

यावेळी मंदिरात पालकमंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, नायब तहसीलदार राजेश थोरे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मानवंदना आणि इतिहास

मुख्यमंत्री शरदचंद्र पवारांचा आदेश, राज्यमंत्री बी. एल. पाटलांची शिष्टाई; श्री धावीर महाराजांच्या सशस्त्र मानवंदनेची परंपरा पुन्हा सुरू!

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या रोह्यातील श्री धावीर महाराजांच्या नवरात्रोत्सवाचे यंदा १६५ वे वर्ष आहे. या उत्सवातील सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण आणि रोहेकरांसाठी अभिमानास्पद परंपरा म्हणजे ब्रिटिश काळापासून चालत आलेली सशस्त्र पोलीस मानवंदना! या मानवंदनेसंदर्भात ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांनी १८६४ साली दिलेली लेखी सनद देवस्थान कडे उपलब्ध आहे. मात्र, काही कारणास्तव १९७२ मध्ये ही ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. रोहेकरांची अढळ श्रद्धा, नागरिकांची एकजूट आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल पाच वर्षांनंतर, १९७८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने ही परंपरा पुन्हा सुरू झाली.

श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी प्रस्थानापूर्वी तसेच संपूर्ण नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर महाराजांना पुन्हा मूळ स्थानी विराजमान करताना सशस्त्र पोलिसांकडून शासकीय मानवंदना दिली जाते. धार्मिक श्रद्धा आणि ऐतिहासिक परंपरेचा संगम असलेली ही मानवंदना रोहेकरांच्या अस्मितेचा मानबिंदू ठरली आहे.

१९७२ मध्ये ही परंपरा बंद झाल्यानंतर ती पुन्हा सुरू व्हावी, यासाठी नवरात्रोत्सव समिती आणि रोहेकर नागरिकांनी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडेही यासंदर्भात वारंवार विनंती करण्यात आली. मात्र, मानवंदना पुन्हा सुरू होण्यासाठी रोहेकरांना तब्बल पाच वर्षे पाठपुरावा करावा लागला.

१८ जुलै १९७८ रोजी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रयत्नांना निर्णायक दिशा मिळाली. रोह्यातील तत्कालीन प्रतिष्ठित नागरिक तात्यासाहेब बारटक्के, डॉ. रमेश राजे, राजाभाऊ देसाई, म. ना. धामणकर, अप्पा सकपाळ, तोरणलाल दामाणी आणि माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल बारटक्के यांनी या विषयासाठी पुढाकार घेतला. तत्कालीन खोपोली-कर्जतचे आमदार तथा महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना. बी. एल. पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्याकडे मानवंदनेची परंपरा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

या सामूहिक प्रयत्नांना अखेर यश आले. मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार १९७८ मध्ये श्री धावीर महाराजांना दिली जाणारी सशस्त्र पोलीस मानवंदना पुन्हा सुरू करण्यात आली. आमदार बी. एल. पाटील यांच्या शिष्टाईला मिळालेले यश आणि रोहेकरांच्या एकजुटीच्या सामर्थ्याची ही ऐतिहासिक साक्ष ठरली. या ऐतिहासिक परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी रोहेकरांनी शरदचंद्र पवार आणि बी. एल. पाटील यांचे आभार मानले!

आजही श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ही परंपरा तेवढ्याच श्रद्धेने जपली जाते. रोहेकरांची अढळ भक्ती, नागरिकांची एकजूट आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी घेतलेले परिश्रम यांचे प्रतीक असलेली ही सशस्त्र पोलीस मानवंदना म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नव्हे, तर रोह्याच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि सामूहिक अस्मितेचा गौरवशाली वारसा आहे.

Comments

Popular posts from this blog