रोह्यात शिंदे गटात राजकीय भूकंप
उपजिल्हाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी
रोहा, दि. ३ (संदीप सरफळे) :- रोहा तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) पक्षांतर्गत गटबाजीने आता टोक गाठले असून, पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी मंगळवारी रोहा येथे ही घोषणा केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
पक्षविरोधी कारवायांचा ठपका
गेल्या काही काळापासून रोहा नगरपरिषद आणि रायगड जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात धुसफूस सुरू होती. ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी या निवडणुकांमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या तालुकाप्रमुख पदावरूनही पक्षात सुंदोपसुंदी सुरू असल्याचे चित्र आहे.
कारवाई बेकायदेशीर: ॲड. मनोजकुमार शिंदे यांचा पलटवार
दरम्यान, ही हकालपट्टी पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी केला आहे. "माझी नियुक्ती दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केली आहे. त्यामुळे मध्य रायगड जिल्हाप्रमुखांना मला पदावरून हटवण्याचा कोणताही अधिकार नाही. ही कारवाई पक्षांतर्गत कायद्याच्या चौकटीत बसत नाही," असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. "राजकारण वंगाळ (वाईट) आहे," अशी खेदजनक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शिंदे सेनेला घरघर?
तालुकाप्रमुख पद भरण्यावरून सुरू असलेले वाद आणि आता बड्या नेत्याची झालेली हकालपट्टी, यामुळे रोहा तालुक्यातील शिंदे गटाची ताकद कमकुवत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला लागलेली ही 'घरघर' आगामी निवडणुकांमध्ये महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments
Post a Comment