विळे आठवडा बाजार बंद, वरचीवाडी (विळे) ग्रामपंचायतीचा निर्णय
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील वरचीवाडी (विळे) ग्रामपंचायत हद्दीत आठवड्याच्या दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार ठराविक कालावधी साठी बंद करण्याचा निर्णय वरचीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे वरचीवाडी ग्रा.पं. सरपंच परशुराम कोदे यांनी सांगितले.
महागाईच्या काळात आठवड्याचा बाजार म्हणजे महिलांसाठी सर्वच वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे. स्वस्त भाजीपाला, सुकी मच्छी, ओली मच्छी, चिकन, मटण व इतर जीवनावश्यक वस्तू बाजारात मिळत असल्याने या बाजारात महिलांची प्रचंड गर्दी होत असते. शिवाय शेकडो व्यापारी बाजारात दुकाने लावतात. त्यामुळे गर्दीचे प्रमाण खूप वाढते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा नागरिकांना होऊ नये म्हणून वरचीवाडी ग्रामपंचायतीने आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी कृपया सहकार्य करावे असे आवाहन वरचीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment