माणगांव नगरपंचायत निवडणूकीत जनसेवा संघटना एक नवीन पर्याय, तरूण वर्गाला आवाहन, माणगांव विकास आघाडीला मदत करण्याचे आवाहन 

माणगांव (राजन पाटील) : रायगड जिल्ह्यातील राजकीय  अस्तित्व व राजकीय प्रतिष्ठेची समजली जाणारी माणगांव नगरपंचायतीची आरक्षण सोडत झाली आहे. निवडणूक आयोगाने काही प्रभागात लोकसंख्येच्या निकषावरून बदल केल्याने अनेकांचे अस्तित्व कायम राखण्यात अपयश येणार असल्याचे स्पष्ट आहे.

विकास झाल्याच्या नावावर बकाल होत चाललेल्या माणगांव नगराचा विकास करण्यासाठी सध्या प्रस्थापित असलेल्या माणगांवमधील भ्रष्टाचारी नगरसेवकांविरुद्ध माणगांव शहरातील सुशिक्षित व राजकीय व सामाजिक जाण असलेल्या तरूणांनी जनसेवा संघटनेचा आधार घेऊन लोकशाहीच्या माध्यमातून पूर्ण ताकतीनिशी उभे राहून माणगांव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकावे. तसेच पक्षविरहीत माणगाव नगराचा विकास करण्यासाठी तसेच स्वच्छ व सुंदर माणगांव निर्माणासाठी मी माणगावकर या ध्येयाने प्रेरीत होऊन माणगांव विकास आघाडीच्या पॅनलखाली निवडणूक लढविण्यासाठी  जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांनी तरूण वर्गाला आवाहन केले आहे. 

येथील सूज्ञ आणि निस्वार्थी समाजसेवा करणाऱ्या नागरिकांना लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी जनसेवा संघटना एक नवीन पर्याय व सुवर्णसंधी देत आहे. या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घेऊन माणगांव विकास आघाडीच्या पॅनलखाली इच्छुक तरूण व नागरिकांनी निवडणूक लढवावी आणि माणगांव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे तसेच आपले माणगांव स्वच्छ, सुंदर व विकसीत करण्याचे आवाहन जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत काशिनाथ ठाकूर यांनी केले आहे. 

माणगांवाची नगर रचना करण्यात आलेले अपयश, गटार बांधणी व स्वच्छतेचा प्रश्न, नाना-नानी उदयान, भाजी मंडई, मासळी बाजार, वाढते अतिक्रमण, रस्ते, वीज, पाणी आरोग्य, बेरोजगारी, शहराठिकाणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव, परराज्यातील आलेले आणि प्रस्थापितांसारखे राज्यकारभार करणारे, नेतृत्व करणारे राजकारण्यांना पायबंद घालणे, त्याचबरोबर जीवनावश्यक  मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले अपयश या व अशाच सर्व गोष्टींत निष्प्रभ ठरलेल्या विद्यमान सत्ताधाऱ्यांना आवर घालण्यासाठी जनसेवा संघटना पुरस्कृत माणगाव विकास आघाडी हा मोठा पर्याय माणगावकरांसमोर ठेऊन निवडणूक लढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog