ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

रोह्यात विद्यार्थ्यांना सुदर्शन क्रियेचा मंत्र

तीन दिवसीय उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढीसाठी पुढाकार

रोहा-रायगड, दि. २२ (प्रतिनिधी) :- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच मानसिक स्वास्थ्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने श्री श्री रविशंकर गुरुदेव यांच्या प्रेरणेतून रोहा शहरात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय सुदर्शन क्रिया उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोहा नगरपरिषदेच्या विविध शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभागी होत सुदर्शन क्रियेचे प्रशिक्षण घेतले.

दि. १९, २० आणि २१ नोव्हेंबर या कालावधीत नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके आणि रोहा नगरपरिषदेच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, मानसिक शांतता, एकाग्रता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षणासाठी बेंगळुरू येथील आश्रमात गुरुदेवांच्या सानिध्यात प्रशिक्षण घेतलेले तसेच मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अनुभवी प्रशिक्षित शिक्षक सहभागी झाले होते. त्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सुदर्शन क्रियेचे महत्त्व आणि त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग समजून घेण्याची संधी मिळाली.

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा वाढता ताण, एकाग्रतेचा अभाव आणि मानसिक आव्हाने लक्षात घेता सुदर्शन क्रियेसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर निरोगी मन, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या दिशेने रोहा नगरपरिषदेने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, नगरपरिषद प्रशासन, प्रशिक्षक, शिक्षकवर्ग आणि समन्वयक हसमुख जैन यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


Comments

Popular posts from this blog