१७ व्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका!
रायगडच्या खेळाडूंची कौतुकास्पद कामगिरी
रायगड, दि. २ (प्रतिनिधी) :- थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने दिनांक २१ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान नांदेड येथे १७व्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. देशभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद करत प्रथम क्रमांकाचे अजिंक्यपद पटकावले आहे. महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक विजयात रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी तब्बल ३१ सुवर्ण, १४ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण ५१ पदके जिंकून तसेच ९ सहभाग नोंदवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सिंहाचा वाटा उचलला आहे. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरच रायगडच्या पदकविजेत्या खेळाडूंची आगामी गोवा येथे आयोजित होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप थाईबॉक्सिंग स्पर्धेसाठी थेट निवड करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी विविध वजनी आणि वयोगटांत चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली. यामध्ये अविशा शिंदे, जिजा भोसले, त्रिशा भोसले, चैत्राक्षि काकडे, वर्धन कदम, फिरोज अन्सारी, अनिकेत दुशिंग, मयूर जाधव, करण शिरोडकर, ऋषिकेश कुमार, एलीजा आदाकुल्ला, मन्मय जट, अथर्व मदाने, वंश कोकरे, जिया मांजरेकर, सानवी सावंत, तन्वी शर्मा, रिया सेल, काव्या शेजाळे, श्रेया कुंडलकर, यशस्वी सावडेकर, विक्रांत खुटले, श्रेयश पवार, शुभम पवार, प्रिशा पाटील, स्नेहा राऊत, प्रभास रहाटे, आर्या लेंडवे, आस्था भगत, दर्शित माळी आणि श्रेया रहाटे यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. यासह वैष्णवी सावंत, स्वामिनी शिर्के, अनन्या पाटील, सोहम सावंत, प्रात्विक मुंडले, आराध्या नंबियार, अवनीश कंक, प्रियल पानसे, आगस्त्या वैदू, शिवांक राणा, आरव नायर, अद्विका गरगडे, निष्ठा चंदाणे आणि रायांश जाधव यांनी रौप्यपदक पटकावून राज्याचा गौरव वाढवला. तर मृगाक्षी पॉल, नक्ष मोरे, अस्मिता शिंदे, गुरु जाधव आणि केशव पाटील यांनी कांस्यपदक मिळवले. याशिवाय सुरेश कुमार, नंदिनी चव्हाण, वैष्णवी खंडागळे, भक्ती पाटील, किमया म्हात्रे, सर्वेश मोरे, अजय जगताप, वंश चव्हाण व अश्विनी घरत या खेळाडूंनी स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवून उत्तम खेळ सादर केला.
खेळाडूंच्या या नेत्रदीपक यशामागे थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष व रायगड थाईबॉक्सिंगचे अध्यक्ष श्री. निलेश भोसले, थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ पनवेल शहराचे अध्यक्ष प्रतिक कारंडे, उरण तालुक्याचे अध्यक्ष सुरज टकले तसेच मार्गदर्शक व प्रशिक्षक सुरेश राठोड, रोहित तळी, योगेश बैकर आणि प्रथम बहिरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल थाईबॉक्सिंग इंडियन फेडरेशनचे अध्यक्ष कुलदीप सुमनाक्षर, सचिव रवींद्र सिंह यांच्यासह थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे चेअरमन डॉ. मंदार पनवेलकर व अध्यक्ष श्री. फरहान नबिजी यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून गोवा येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या घवघवीत यशामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात क्रीडाप्रेमींकडून खेळाडूंचे मोठे कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment