ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड पत्रकारितेचा वसा जपणारे 'देश विदेश टाईम्स'चे संपादक सचिन साळुंखे

शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची पोलखोल; मुजोर अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराला चाप

 सत्य आणि निष्ठेची नवी ओळख 

​रोहा (विशेष प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचे पावित्र्य जपत, सामान्य जनतेच्या हक्कासाठी सतत रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे 'देश विदेश टाईम्स'चे मुख्य संपादक सचिन रजनी वामन साळुंखे यांचे कार्य सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. प्रशासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची होणारी अडवणूक रोखण्यापासून ते थेट अन्यायाला वाचा फोडण्यापर्यंत त्यांनी नेहमीच आक्रमक व अभ्यासू भूमिका घेतली आहे. अनेक सरकारी कार्यालयांत न्याय मागण्यासाठी जाणाऱ्या गोरगरीब जनतेला काही मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जातो, अशा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची पोलखोल करत त्यांना कायद्याची योग्य जागा दाखवून देण्याचे आणि सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे धाडस सचिन साळुंखे यांनी सातत्याने दाखवले आहे.
​स्थानिक पातळीवर नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला वेळोवेळी धारेवर धरले आहे. विविध शासकीय दाखले व कागदपत्रे वेळेत न देणे तसेच नियमापेक्षा जादा पैसे उकळून नागरिकांची लूट करणाऱ्या 'आपले सरकार' सेतू केंद्रांच्या मनमानीला त्यांनी थेट चाप लावला. ग्राहकांकडून जादा पैसे घेणाऱ्या केंद्रांवर वचक निर्माण करत, प्रत्येक नागरिकाला नियमानुसार पैशांची अधिकृत पावती देणे बंधनकारक करण्यास त्यांनी प्रशासनाला भाग पाडले. इतकेच नव्हे तर रोहा तहसील व प्रांत कार्यालयात रात्री-अपरात्री चालणाऱ्या संशयास्पद हालचालींवर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नजर ठेवत, अंधाऱ्या रात्रीत रॉयल्टीच्या पावत्यांचे बॉक्सच्या बॉक्स परस्पर पळवून नेणाऱ्या अधिकाऱ्यांचे कारनामे थेट रंगेहाथ पकडून जगासमोर आणण्याचे अत्यंत धाडसी काम त्यांनी केले. या धडक कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती आणि सचिन साळुंखे यांच्या निर्भीड पत्रकारितेचा एक वेगळाच दबदबा संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाला.
​नागरी समस्या आणि प्रवाशांच्या हालअपेष्टांवरही त्यांनी नेहमीच आक्रमक पवित्रा घेतला आहे. रोहा येथील मध्यवर्ती एसटी बस स्थानकातील सार्वजनिक शौचालय तब्बल १५ दिवस बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांचे, विशेषतः महिला प्रवाशांचे अतोनात हाल होत होते आणि त्यांना तीव्र गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. ही गंभीर बाब लक्षात येताच सचिन साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन एसटी प्रशासनाला जाब विचारत अक्षरशः धारेवर धरले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि जनहिताच्या दबावामुळे अखेर प्रशासनाला तातडीने नमते घ्यावे लागले आणि त्या बंद शौचालयाचे दरवाजे तत्काळ उघडून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
​केवळ आक्रमक बातमीदारी आणि प्रशासकीय गैरकारभाराविरुद्ध लढा देण्यापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा मोठा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागातील 'निवि ठाकूरवाडी' येथील प्राथमिक शाळा दत्तक घेऊन त्यांनी तेथील गरजू व वंचित विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची खरी गोडी निर्माण केली. शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्याची पूर्तता आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देत शिक्षणाचा प्रवाह तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे. सामाजिक जाणिवेतून दरवर्षी नियमितपणे पाच ते सहा विविध लोकोपयोगी व समाजहितैषी उपक्रम राबवून त्यांनी गोरगरीब घटकांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे.
​समाजातील चांगल्या कार्याची पावती म्हणून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि निस्वार्थ भावनेने योगदान देणाऱ्या गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा यथोचित सन्मान व्हावा, यासाठी त्यांच्या पुढाकाराने दरवर्षी भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. गेली अनेक वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे मोलाचे कार्य घडत आहे. आपल्या नावात आई आणि वडील या दोघांचाही अत्यंत आदरपूर्वक समावेश करून 'सचिन रजनी वामन साळुंखे' असा उल्लेख करणारे साळुंखे हे नैतिक मूल्यांची जपणूक करत निर्भीड पत्रकारिता, भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा आणि निरंतर समाजसेवा या त्रिसूत्रीवर आजही अविरत कार्यरत आहेत. त्यांच्या या व्यापक कार्याबद्दल रोहा परिसरातील नागरिक, वाचक आणि विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे मनःपूर्वक कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog