स्वातंत्र्याची ८० वर्षे उलटूनही आदिवासी वाड्यांना रस्ता नाही!
गरोदर महिला व रुग्णांसाठी डोलीचाच आधार
निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
नागोठणे-रायगड, दि. २५ (महेंद्र माने) :- देशाला स्वातंत्र्य मिळून आठ दशके लोटली तरी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाबळ ग्रामपंचायत हद्दीतील गौळावाडी आणि पावटावाडी या आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. स्वातंत्र्याची ८० वर्षे उलटूनही या वाड्यांना जोडणारा पक्का रस्ता तयार न झाल्याने येथील ग्रामस्थांना अत्यंत खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती बिकट बनत असून गरोदर महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी चक्क डोलीचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता जोपर्यंत पक्का रस्ता होत नाही, तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलेटी येथून जांबोशी गावापर्यंत डांबरी रस्ता झाला असून तिथून वाहतूक सुरू आहे. मात्र, जांबोशी गावापासून पुढे गौळावाडी आणि पावटावाडीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता अस्तित्वात नाही. पावसाळ्यात हा संपूर्ण कच्चा मार्ग चिखलमय आणि निसरडा होतो, ज्यामुळे दुचाकी चालवणेही जीवघेणे ठरते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आजारी रुग्ण किंवा बाळंतपणासाठी जाणाऱ्या गरोदर महिलांना सुमारे अडीच किलोमीटरचे अंतर डोलीतून वाहून न्यावे लागते. याशिवाय, आदिवासी बांधवांनी पिकवलेले धान्य, भाजीपाला बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी तसेच दैनंदिन घरगुती साहित्याची वाहतूक करण्यासाठी ग्रामस्थांना डोक्यावर ओझे वाहून पायपीट करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून ग्रामस्थांना आठ-आठ दिवसांनी दुरुस्ती व सर्व्हिसिंग करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा रस्ता ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ किंवा इतर शासकीय योजनांमधून तातडीने मंजूर करण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. याबाबतचे सविस्तर निवेदन पालकमंत्री, स्थानिक खासदार, आमदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून दिले जाणार आहे. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ग्रामस्थ वामन खंडवी यांनी सांगितले की, रस्ता खराब असल्यामुळे गरोदर महिला व आजारी माणसांना नेण्यासाठी डोलीचा वापर करावा लागतो, माझ्या मुलीच्या बाळंतपणाच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असताना गावकऱ्यांनी डोलीला मेणकापड बांधून तिला सुरक्षितपणे दवाखान्यात नेले होते, त्यामुळे गाववाल्यांनी केलेल्या उपकारांची परतफेड होऊ शकत नाही. तर ग्रामस्थ नारायण खंडवी यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे उलटली तरी आमचा रस्ता होत नसून जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत आगामी प्रत्येक निवडणुकीवर आम्ही सर्व ग्रामस्थ ठामपणे बहिष्कार टाकणार आहोत. यावेळी अनिल खंडवी, हिरामण खंडवी, लक्ष्मण लेंडी, काशीनाथ खंडवी आणि भाऊ दोरे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments
Post a Comment