ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

'सेवा, संवेदनशीलता आणि नवोपक्रम'चा संकल्प

रोहा लायन्स क्लबच्या ५३ व्या पदग्रहण सोहळ्यात मिलन शाह अध्यक्षपदी विराजमान

रोहा-रायगड, दि. २७ (प्रतिनिधी) :- समाजसेवेची ५३ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या लायन्स क्लब ऑफ रोहाच्या ५३ व्या पदग्रहण सोहळ्याचा दिमाखदार उत्सव शुक्रवारी अक्षय लॉन्स, निवी रोड, रोहा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी लायन ॲड. मिलन शाह यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. समाजसेवेचा वारसा जपत "सेवा, संवेदनशीलता आणि नवोपक्रम" या ब्रीदवाक्यासह त्यांनी नव्या कार्यकाळाची दमदार सुरुवात केली.

दानशूर व सेवाभावी स्वर्गीय हर्षदभाई शाह यांच्या समाजसेवेचा वारसा लाभलेले लायन ॲड. मिलन शाह यांनी यापूर्वी क्लबमध्ये सचिव, खजिनदार व उपाध्यक्ष या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून परोपकारी, धार्मिक व सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानामुळे ते परिसरात आदराचे स्थान निर्माण करून आहेत.

यावेळी लायन संजय एकल यांनी सचिव, लायन माया कौशिक शाह यांनी कोषाध्यक्ष, लायन जयदेव पवार यांनी प्रथम उपाध्यक्ष तर लायन डॉ. कृष्णा जरग यांनी उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच तरंग दिवाण, प्रज्वल बापट, ॲड. अभिजित वारंगे, निधी गर्ग आणि सतीश शिंदे यांचा नवीन सदस्य म्हणून क्लबमध्ये समावेश करण्यात आला.

या पदग्रहण सोहळ्यास जिल्हा गव्हर्नर लायन प्रवीण सरनाईक, जिल्हा सचिव लायन नयन कवळे, ज्येष्ठ लायन सदस्य प्रदीपभाई दामाणी, नुरुद्दीन रोहावाला, घरत साहेब, माजी अध्यक्ष लायन लक्ष्मण शिताळकर, जिल्हा अध्यक्षा विद्या अधिकारी, झोन चेअरपर्सन डॉ. मंजुषा, गुजराती समाजाचे अध्यक्ष लायन भावेश दामाणी, अलेफिया रोहावाला, जुमाना रोहावाला यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेली ५३ वर्षे लायन्स क्लब ऑफ रोहा मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया, Relieve the Hunger अभियान, बालकल्याण, बालकर्करोग जनजागृती, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्षारोपण तसेच विविध लोकहितकारी उपक्रम राबवत समाजसेवेचा वसा जपत आहे. निसर्ग चक्रीवादळ आणि महाड महापुराच्या काळातही क्लबने मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी सिद्ध केली होती.

नवीन अध्यक्ष लायन ॲड. मिलन शाह यांनी यंदाच्या वर्षात किमान २०० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांसाठी Artificial Intelligence विषयावरील प्रशिक्षण, मुलींसाठी Good Touch – Bad Touch जनजागृती, Relieve the Hunger अभियानाद्वारे कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रयत्न, महिला सक्षमीकरण आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

"समाजसेवा हेच खरे ब्रीद" जपत नव्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब ऑफ रोहा सामाजिक कार्यात नवे मानदंड प्रस्थापित करेल आणि अधिक व्यापक लोकसेवा उभी करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog