लिटल स्टार्स इंग्लिश हायस्कूलमध्ये एसएससी गुणवंत व उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा संपन्न
वरळी-मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) :- प्रभादेवी व वरळी परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या वरळी येथील प्रतिष्ठित 'लिटल स्टार्स इंग्लिश हायस्कूल' मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सर्वांगीण कामगिरीचा गौरव करण्यासाठी एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडला. मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत शाळेने १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून, याच दैदिप्यमान यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि गुणवंतांच्या कौतुकासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामध्ये गुजराती संस्कार मंडळाचे अध्यक्ष श्री. बिपीन भटाविया, सचिव सौ. सुजाता शहा, खजिनदार श्री. दिनेश नागडा आणि सदस्य सौ. आरती त्रिवेदी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच 'एकम फाऊंडेशन मुंबई'च्या कार्यक्रमातील सहभागी सौ. सारिका जाधव व कु. सोनाली यांचीही विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय आदर्श नगर सेवा समितीचे सचिव श्री. नरेंद्र शिर्के, उपाध्यक्ष श्री. अनिल इंदुलकर, सहसचिव श्री. रामदास राहाटे, खजिनदार सौ. अंबिका रायपेल्ली, सदस्य श्री. अमित सावंत आणि माजी खजिनदार श्री. सुनील करवाडे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यासोबतच 'वृत्तमानस'चे संपादक श्री. नवनीत दांडेकर आणि समाजसेवक श्री. दीपक कायंदेकर यांची सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली होती.
या सोहळ्यात मार्च २०२६ च्या एसएससी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा चषक, विशेष भेटवस्तू आणि रोख पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये ९३.४०% गुण मिळवून शाळेत प्रथम आलेला कु. श्रवण पारकर, ९२.५०% गुणांसह द्वितीय क्रमांक पटकवणारा कु. अनुपम यादव, ९१.२०% गुण मिळवणारी कु. श्रुती कळंबे, ८९.९०% गुण मिळवणारा कु. अभय जैस्वाल, ८७.४०% गुणांसह यश मिळवणारी कु. मानसी जैस्वार आणि ८७% गुण मिळवणारी कु. सोनल जैस्वाल या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. एसएससीच्या विद्यार्थ्यांसोबतच विविध शैक्षणिक विषयांत प्राविण्य मिळविणाऱ्या आणि इतर सहशालेय व क्रीडा उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. इयत्ता ५ वी ते १० वी मधील सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीची पावती म्हणून प्रशंसा चषक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रीना वासुदेवन मुदलियार यांनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावरील कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. शाळेच्या या १००% निकालाचे आणि यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी अत्यंत पात्र व अनुभवी शिक्षकवर्ग, शाळेतील कडक शिस्त आणि पालकांकडून मिळालेल्या सातत्यपूर्ण सहकार्याला दिले. सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांनी लिटल स्टार्स इंग्लिश हायस्कूलच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीचे मनःपूर्वक कौतुक केले आणि विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे यशाची शिखरे पादाक्रांत करून उत्कृष्ट कामगिरी करावी, अशा शुभेच्छा दिल्या. उपस्थितांच्या टाळ्यांचा गजर आणि आनंदी वातावरणात या गौरव सोहळ्याची सांगता झाली.

Comments
Post a Comment