वंचित बहुजन आघाडीचे राजिप अध्यक्षांना निवेदन
समाजकल्याण निधीतून बहुजनांचा विकास करण्याची सुनिल धामणकर यांची मागणी
बेणसे-रायगड, दि. १७ (चंद्रकांत अडसुळे) :- वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष सुनिल धामणकर यांनी आज रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांची भेट घेऊन उंबर्डे बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भेट घेतेवेळी तालुक्यातील इतर बौद्ध समाजासाठी देखील समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून विकासात्मक कामे करण्यास प्राधान्य द्यावे अशा प्रकारचे निवेदन सादर केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनिल धामणकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज वास्तव्य करत असून या समाजाच्या ठिकठिकाणी बौद्ध वाड्या आहेत. मात्र त्यांनी तालुक्यातील आढावा घेतला असता बौद्ध समाज वास्तव करत असणाऱ्या ठिकाणी आवश्यक अशी रस्ते, शुद्ध पाणी,स्मशानभूमीत प्रेत ठेवण्यासाठी लोखंडी खांब नाहीत,स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ते नाहीत,स्मशानभूमीवर शेड नाही, लाईट, सांडपाणी व्यवस्था, आरोग्य व शिक्षण यांसारख्या सुविधा समाधानकारक झालेल्या दिसत नाहीत. सदर ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून योग्य त्या मूलभूत नागरी सुविधा देण्यास प्राधान्य देण्याची विशेष मागणी त्यांनी सदर निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी देखील उंबर्डे बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत येत्या आठवड्यात आढावा घेऊन त्यातून मार्ग काढला जाईल असे सांगून सदर दिलेल्या निवेदनाबाबत देखील आम्ही सकारात्मक विचार करणार असून बौद्ध समाजाच्या वाड्या व वस्त्या ज्या ठिकाणी असतील त्याठिकाणी विकासात्मक कामे करण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले जाईल अशा प्रकारे आश्वासीत केले आहे. सदर निवेदन देते वेळी तालुका अध्यक्ष सुनिल धामणकर यांच्या सोबत नागेश जनार्दन सुर्वे (बहुजन विध्यार्थी संघटना पेण ता. अध्यक्ष), चिंतामण कांबळे, उंबर्डे गावचे अमित कांबळे, उत्तम कांबळे, प्रथमेश कांबळे, कृणाल भोजने हे देखील उपस्थित होते.
"आम्ही पेण तालुक्यात काम करत असताना किंवा बौद्ध वाड्यांवर विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी जात असताना त्या ठिकाणचे नागरिक कोणत्या ना कोणत्या नागरी सुविधांबाबत समस्यांचे गाऱ्हाणे आमच्या कानावर घालत आहेत. या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर अनेक नागरी समस्या भेडसावत असल्याचे लक्षात आल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आमच्या या भागाकडे विकासात्मक दृष्टिकोनातून लक्ष देण्यात यावे, त्यासाठी तेथील बौद्ध समाजाचे नागरिक नेहमी सहकार्यशील असतील.अशी आम्हाला खात्री आहे की रायगड जिल्हा परिषद आमच्या निवेदनाचा योग्य विचार करेल", अशी प्रतिक्रीया वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष सुनिल धामणकर यांनी दिली.


Comments
Post a Comment