ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

आदिवासी आश्रम शाळा चिरनेर येथे ‘सायरा समीर म्हात्रे संस्थे’च्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप!

 वैती परिवाराचा स्तुत्य उपक्रम 

पनवेल-रायगड, दि. १३ (सुरेश तांडेल) :- ​‘माणुसकीची साथ, मदतीचा हात’ हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवून समाजातील गोरगरीब आणि अनाथ मुलांना मदतीचा हात देण्याच्या तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील समाजसेवक तथा ग्रामपंचायत सदस्य समीर म्हात्रे यांनी २२ ऑगस्ट २०२३ रोजी ‘सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे’ या संस्थेची स्थापना केली. स्थापनेपासूनच समाजसेवेची आवड असणाऱ्या समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, मोफत शिकवणी वर्ग, रक्तदान शिबिरे, आदिवासी बांधवांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप, अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, सामाजिक संस्थांना पुरस्कार देणे आणि वृक्षारोपण यांसारखे अनेक कौतुकास्पद सामाजिक उपक्रम अविरतपणे राबवले जात आहेत.

​संस्थेच्या या अविरत सामाजिक कार्याची प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल आणि समीर म्हात्रे यांची समाजसेवेची असलेली खरी तळमळ यातून प्रेरित होऊन, मुलुंड येथील वैती परिवाराने एक स्तुत्य निर्णय घेतला. वैती परिवाराने आपल्या निवासस्थानी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून, दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना पुष्पगुच्छ किंवा इतर वस्तू ऐवजी शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात आणण्याचे जाहीर आवाहन केले होते. वैती परिवाराच्या या अनोख्या आवाहनाला भाविकांनी देखील अत्यंत उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. या माध्यमातून गणेशोत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणावर वह्या, पेन, पेन्सिली तसेच इतर उपयुक्त शैक्षणिक साहित्य जमा झाले.

​भाविकांच्या अत्यंत मोलाच्या सहकार्यातून संकलित झालेले हे सर्व शैक्षणिक साहित्य रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी चिरनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अत्यंत उत्साहात वाटप करण्यात आले. वैती परिवार आणि सायरा समीर म्हात्रे संस्थेच्या या संयुक्त उपक्रमामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली असून, यामुळे समाजातील दातृत्वाची भावना अधिक दृढ झाली आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे सध्या सर्वच स्तरांतून प्रचंड कौतुक होत आहे.

​या स्तुत्य आणि यशस्वी उपक्रमासाठी मुलुंड येथील वैती परिवारातील भावेश अनिल वैती, सोनी भावेश वैती, चेतन सुनील वैती यांचे विशेष योगदान लाभले. त्याचप्रमाणे आदिवासी आश्रम शाळा चिरनेरचे मुख्याध्यापक श्री. मोरे सर, संस्थेचे सक्रिय सदस्य पद्माकर पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश तांडेल (कासरभट) यांचेही या संपूर्ण कार्यात मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांनी दाखवलेल्या सामाजिक भान आणि सहकार्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर म्हात्रे यांनी संस्थेच्या वतीने सर्वांचे जाहीर आणि विशेष आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog