ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

बार्टीतील प्रशासकीय ठप्पपणा विरोधात स्वयंदीप सोशल फाउंडेशन आक्रमक!

विद्यार्थ्यांच्या अडचणींनंतर स्वयंदीप सोशल फाउंडेशनचे मंत्र्यांना साकडे

 ​‘बार्टी’ला पूर्णवेळ महासंचालक मिळेना 

बेणसे-रायगड, दि. १३ (चंद्रकांत अडसुळे) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या शासकीय स्वायत्त संस्थेचा कारभार मागील पाच महिन्यांपासून पूर्णवेळ महासंचालकांअभावी रामभरोसे चालला असून, यामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय ठप्पपणा विरोधात आता स्वयंदीप सोशल फाउंडेशनने आवाज उठवला आहे. संस्थेला पूर्णवेळ महासंचालक नसल्यामुळे बार्टीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी व शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी रखडली आहे. सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे असल्याने, विद्यार्थ्यांना आपल्या विविध अडचणी आणि प्रश्न घेऊन त्यांची भेट घेणे अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर याचा परिणाम होत आहे.

​या गंभीर समस्येची दखल घेत स्वयंदीप सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने मे २०२६ मध्येच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री मा. संजय शिरसाट आणि प्रधान सचिव मा. हर्षदीप कांबळे यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाद्वारे बार्टी संस्थेमध्ये लवकरात लवकर पूर्णवेळ व हक्काच्या महासंचालकांची नेमणूक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. मात्र, या निवेदानाला दीर्घ काळ उलटून गेल्यानंतरही अद्याप प्रशासनाकडून पूर्णवेळ महासंचालकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

​शासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या वतीने आज माननीय मंत्री संजय शिरसाट यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या विषयाचे स्मरणपत्र सादर करण्यात आले. संस्थेचे सभासद कल्पना कांबळे आणि भीमराव मोटे यांनी मंत्र्यांची भेट घेऊन बार्टीमधील सद्यस्थिती आणि विद्यार्थ्यांचे हाल त्यांच्या निदर्शनास आणून दिले, तसेच रखडलेली ही नियुक्ती तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यावर आता मंत्री महोदय काय पाऊल उचलतात, याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog