मानवतेची सेवा आणि दृष्टीदानाचा महायज्ञ.!
रोहा सिटिझन फोरम ट्रस्टच्या माध्यमातून २५०० पेक्षा अधिक रुग्णांना लाभली नवी दृष्टी
रोहा, दि. १० (संदीप सरफळे) :- सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थ सेवेचा वारसा जपत 'रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट'ने रायगड जिल्ह्याच्या सामाजिक पटलावर आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. "अंधत्वातून दृष्टीकडे मोतीबिंदू मुक्त रोहा अभियान" हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून या संस्थेने सुरू केलेला प्रवास आज एका ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दर महिन्याला आयोजित केल्या जाणाऱ्या मोफत नेत्ररुग्ण तपासणी शिबिरांच्या माध्यमातून या ट्रस्टने केवळ आरोग्य सेवाच दिली नाही, तर शेकडो कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी किरणे पसरवली आहेत. या शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांच्या डोळ्यांची अत्यंत सूक्ष्म आणि अचूक तपासणी केली जाते, ज्यामध्ये मोतिबिंदू किंवा इतर गंभीर समस्या आढळणाऱ्या अनेक रुग्णांना पुढील उपचारांसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध 'आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल' येथे पाठवण्यात येते.
गेल्या वर्षभराचा आढावा घेतल्यास रोहा सिटिझन फोरमच्या या कार्याची भव्यता प्रकर्षाने दिसून येते. तीन वर्षात २५०० पेक्षा अधिक नेत्ररुग्णांच्या मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करून या संस्थेने सेवेचा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या यशस्वी शस्त्रक्रियांमुळे सर्वसामान्यांमध्ये संस्थेप्रती असलेली विश्वासार्हता इतकी वाढली आहे की, आता तपासणी शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गोरगरीब आणि गरजू रुग्णांना कोणतीही आर्थिक चिंता न करता जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने, या अभियानाने जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. नेत्र रुग्णांना नवी दृष्टी प्रदान करून त्यांच्या जीवनातील अंधार दूर करणाऱ्या या शिबिराने यशस्वी शस्त्रक्रियांच्या बाबतीत नोंदविलेला हा उच्चांक संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ मानले जात आहे.
हा सेवाभावी उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा सिटिझन फोरम ट्रस्टची संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन परब यांच्या नेतृत्वाखाली आणि निमंत्रक अप्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद अष्टिवकर, श्रीकांत ओक, इल्यास डबीर, संदीप सरफळे, दिनेश जाधव, प्रशांत देशमुख, परशूराम चव्हाण, अमोल देशमुख, शैलेश रावकर, सिद्देश ममाले, दिनेश मोहिते, समिधा अष्टिवकर, भावेश अग्रवाल, बिलाल मोर्बेकर यांसह फोरमचे सर्व सदस्य अत्यंत नियोजित पद्धतीने शिबिराचे कामकाज पाहतात. रुग्णांची नावनोंदणी करण्यापासून ते त्यांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात नेण्यापर्यंत आणि पुन्हा सुखरूप घरी पोहोचवण्यापर्यंतची सर्व जबाबदारी हे सदस्य अतिशय आपुलकीने पार पाडतात. त्यांच्या या सामूहिक परिश्रमांमुळेच रोहा शहर आज 'मोतीबिंदू मुक्ती'च्या दिशेने वेगाने पावले टाकत असून, या सामाजिक उपक्रमाचे कौतुक संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे.

Comments
Post a Comment