किशोरवयीन मुलींना एचपीव्ही लस आता मोफत
महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी रोह्यात लसीकरण मोहिमेचा यशस्वी शुभारंभ
रोहा नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम
रोहा, दि. ६ (संदीप सरफळे) :- महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे या उदात्त हेतूने राज्य शासनाने हाती घेतलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहीम रोहा शहरात अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. रोहा नगरपरिषद आणि पुणे येथील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी या लसीकरण व जनजागृती मोहिमेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयांमध्ये साधारणतः ३ ते ५ हजार रुपयांच्या घरात किंमत असलेली ही लस रोहा नगर परिषदेच्या विशेष पुढाकारामुळे किशोरवयीन मुलींना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. सोमवारी स्थानिक ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी सुमारे १९५ युवती व भगिनींनी लसीकरणाचा लाभ घेत आपला सहभाग नोंदवला.
महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून कायमस्वरूपी संरक्षण मिळावे, या उद्देशाने या विशेष आरोग्य उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. पूजा भट, डॉ. अपूर्वा क्षीरसागर, डॉ. फरीद चिमावकर, डॉ. प्रियांका धनावडे आणि डॉ. अवनी शेडगे या तज्ज्ञ वैद्यकीय पथकासह नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी तसेच गटनेते महेंद्र गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नीता हजारे, उपसभापती गौरी बारटक्के आणि विविध विषय समित्यांचे सभापती महेश कोलाटकर, मयुर दिवेकर, रवींद्र चाळके यांच्यासह नगरसेवक अजित मोरे, रोशन चाफेकर व नगरसेविका स्नेहा अंबरे, संजना शिंदे, सुप्रिया जाधव, आफरीन रोगे, फराह पानसरे, पूर्वा मोहिते आणि नगरपरिषदेचे सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. पूजा भट यांनी उपस्थितांना या लसीचे महत्त्व विशद करताना सांगितले की, सद्यस्थितीत भारतीय महिलांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कारण ठरत आहे. हा धोका टाळण्यासाठी 'एचपीव्ही' लस अत्यंत प्रभावी आणि पूर्णपणे सुरक्षित असून, ९ ते २६ वयोगटातील मुलींनी ही लस घेतल्यास त्यांना भविष्यात या आजारापासून सुमारे ९० टक्के संरक्षण मिळते. समाजात या लसीबाबत अनेक अफवा किंवा गैरसमज पसरलेले दिसतात, परंतु त्याला कोणताही शास्त्रीय आधार नसून पालकांनी आपल्या पाल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी निर्धास्तपणे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, रोह्यातील महिला भगिनींना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारातून या मोफत लसीकरणाची संधी प्राप्त झाली आहे. मंत्री महोदया महिलांच्या आरोग्याबाबत नेहमीच तत्पर असून त्यांनी या मोहिमेसाठी आवश्यक असणारा निधी कोणताही विलंब न लावता तात्काळ उपलब्ध करून दिला आहे. याबद्दल त्यांनी मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले. शहरातील डॉक्टरांच्या सक्रिय सहभागामुळे या मोहिमेबाबत नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध भाषांमधून जनजागृती करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या लसीकरणाचा लाभ पोहोचवण्याचा नगर परिषदेचा मानस आहे. या मोहिमेस शहरातील युवतींनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयूर दिवेकर यांनी केले.

Comments
Post a Comment