ब्रेकिंग न्यूज
🚨 डॉ. सचिन पोरे आणि इंजि. महेश चव्हाण यांची रायगड जिल्हा पर्यावरण समितीवर 'तज्ज्ञ' म्हणून नियुक्ती... 🚨 अखिल भारतीय पोलीस टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचा ऐतिहासिक विजय; आरपीएफवर मात करत पटकावले विजेतेपद... 🚨

रोहा नगरपालिकेच्या कर वसुलीला ‘गॅलेक्सी’चे ग्रहण!
मोठ्यांचे लाड, सामान्यांवर जप्ती
 ७६ टक्क्यांवरच वसुली आटोपली 

रोहा, दि. १० (संदीप सरफळे) :- रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची समजली जाणारी रोहा नगरपालिकेची आर्थिक घडी यंदा विस्कटल्याचे चित्र समोर आले आहे. कर वसुलीचा टक्का थेट ७६ टक्क्यांवर घसरल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांची घसरण प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

सामान्य नागरिकांकडून वेळेवर कर वसूल करण्यात तत्पर असलेली नगरपालिका मोठ्या थकबाकीदारांसमोर मात्र हात टेकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शहरातील नामांकित ‘गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ने मिळकत कर व इमारत भाडे मिळून तब्बल १७ लाख रुपये थकविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लाखोंची उलाढाल करणाऱ्या या संस्थेकडून कर वसुली करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून कर वाढवण्यात आला, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला. मात्र, दुसरीकडे बडे विकासक आणि मोबाईल टॉवरधारक लाखो रुपयांचा कर बुडवत असल्याने “एक नियम गरीबांसाठी, दुसरा श्रीमंतांसाठी?” असा सवाल उपस्थित होत आहे.

२०२५-२६ या आर्थिक वर्षात ५ कोटी १३ लाख रुपयांचीच वसुली झाली असून अपेक्षित उद्दिष्टाच्या तुलनेत ती फक्त ७६ टक्के आहे. चार वर्षांनंतर लोकप्रतिनिधींची एंट्री झाल्याने कर वसुलीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात उलटच चित्र दिसत आहे. या घसरणीमुळे शहरातील विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

नगरपालिकेची आर्थिक अवस्था बिकट झाल्याने प्रशासनाने पाणीपट्टीत तब्बल ५५ टक्क्यांची वाढ करून नागरिकांच्या खिशावर आणखी भार टाकला आहे. पण मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती मात्र दिसत नाही.

मोठे थकबाकीदार ठरले ‘डोकेदुखी’

गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल – ₹१७ लाख

प्रायमा डेव्हलपर्स – ₹१२ लाख

जीटीएल इन्फ्रा मोबाईल टॉवर (रामप्रकाश कुशवाह) – ₹११.५६ लाख

अल्टीअस डिजिटल इन्फ्रा (रश्मिन लियाकत हाफिज)– ₹१०.२१ लाख

इंडस टॉवर (वर्षा सचिन लिंबोरे)– ₹७.८९ लाख

रोहा प्राईम स्क्वेअर (रईस अंसारी)– ₹५.२३ लाख, (रफिक शेख)-₹३.४४ लाख

रिषभ बिल्डर्स – ₹२.२६ लाख


"मोबाईल टॉवरच्या वसुलीवर शासन निर्बंध असल्याने सुमारे ३५ लाख रुपये अडकून पडले असून शासकीय इमारतींचा मालमत्ता कर उशिराने जमा होत असल्यामुळे टक्केवारी घसरल्याचे दिसून येत आहे"

- अजयकुमार एडके, मुख्याधिकारी रोहा नगर पालिका

Comments

Popular posts from this blog