ग्रामीण भागातील शाळा होणार 'स्मार्ट'; जि.प. सदस्या पल्लवी भोईर व संजय भोईर यांचा शैक्षणिक क्रांतीचा निर्धार
पेण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची आकस्मिक पाहणी; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद
बेणसे-रायगड, दि. २९ (चंद्रकांत अडसुळे) :- रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या सौ. पल्लवी प्रसाद भोईर आणि पेण पंचायत समितीचे माजी सभापती तथा नवनिर्वाचित सदस्य संजय धाया भोईर यांनी पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याच्या निर्धाराने कंबर कसली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी नुकतीच चोळे, शिहू, मुंढाणी आणि बेणसे येथील जिल्हा परिषद शाळांना आकस्मिक भेट देऊन तेथील शैक्षणिक स्थितीची सखोल पाहणी केली. सद्यस्थितीत खाजगी शाळा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारत असताना, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे 'स्मार्ट' शिक्षण मिळावे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.
या भेटीदरम्यान उभय सदस्यांनी केवळ शाळेच्या इमारतींचीच पाहणी केली नाही, तर वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील प्रत्येक शाळा डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी सौ. पल्लवी भोईर यांनी व्यक्त केले. शाळांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता तिथे डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल लर्निंग सेटअप आणि ई-लर्निंग कंटेंटची उपलब्धता असावी, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. विशेषतः 'एक विद्यार्थी एक पुस्तक' यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम, मिनी ग्रंथालयाची स्थापना आणि स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्टरच्या माध्यमातून अध्यापन करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर त्यांनी भर दिला आहे.
केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य आधारित शिक्षण (Skill-based Education) देण्याचा मानस संजय भोईर यांनी बोलून दाखवला. यामध्ये संगणक साक्षरता, बेसिक टेक्नॉलॉजी आणि संवाद कौशल्य सुधारण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत, त्यांच्यासाठी विशेष जादा तासिकांचे आयोजन करणे, भविष्यातील करिअरसाठी मार्गदर्शन करणे आणि प्राथमिक स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांची ओळख करून देणे यांसारख्या योजना राबवण्याचा त्यांचा संकल्प आहे. या दौऱ्यात शाळेतील भौतिक सुविधा, शिक्षकांची नियमित उपस्थिती, शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, शाळांमधील स्वच्छता आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य या सर्व बाबींचा बारकाईने आढावा घेण्यात आला.
शाळांचा परिसर स्वच्छ, हरित आणि तंत्रज्ञानयुक्त असावा जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळेल, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. ग्रामीण भागातील मुलांमध्ये उपजत बुद्धिमत्ता असते, तिला केवळ आधुनिक साधनांची जोड मिळाल्यास ते विद्यार्थी शहरातील विद्यार्थ्यांच्या तोडीस तोड प्रगती करू शकतात, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील जाणकार, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment