तहसील कार्यालयावर रोहेकरांची धडक!
कुंडलिका नदी प्रदूषणावर प्रशासनाला जाब
रोहा, दि. २८ (संदीप सरफळे) :- कुंडलिका नदीत सर्रासपणे गटारांचे सांडपाणी आणि रसायनमिश्रित घाण सोडली जात असल्याच्या संतापातून रोहेकरांनी आज तहसील कार्यालयावर धाड टाकत प्रशासनाला अक्षरशः जाब विचारला. कुंडलिका नदी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, रोहा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, सुधीरकुमार यादव, ऊदय करडे, महेश बामुगडे, सुरेन्द्र निंबाळकर, प्रथमेश शिर्के, ॲड दिपक भगत, यज्ञेश भांड, उध्दव आव्हाड, सौ. अलेफिया रोहावाला आदी मान्यवर उपस्थित होते.
“नदी वाचवायची की प्रदूषणाला मोकळे रान द्यायचे?” असा थेट सवाल करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील गटारांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट कुंडलिका नदीत सोडले जात असल्याने नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही नगरपरिषद आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप करण्यात आला.
समितीच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा १९७४ आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ही गंभीर गुन्हेगारी बाब आहे. दोषींवर कारावास आणि दंडाची तरतूद असतानाही संबंधित अधिकारी मात्र “थातुरमातुर उत्तरे” देत वेळकाढूपणा करत आहेत, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
रोहा शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे सांडपाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारण्यात प्रशासन पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही नदी प्रदूषित होत असल्याचे मान्य करून नगरपरिषदेला कळवले असतानाही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब विशेष संतापजनक असल्याचे सांगण्यात आले.
“कुंडलिका नदीला गटार बनविण्याचा उद्योग तात्काळ थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा समितीने दिला आहे. तसेच, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून नदीचे पुनर्जीवन करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली.
दरम्यान, नागरिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून आता तरी कुंडलिका नदीच्या प्रश्नावर ठोस पावले उचलली जातात का, याकडे रोहेकरांचे लक्ष लागले आहे.


Comments
Post a Comment