जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
रोहा, दि. २८ (संदीप सरफळे) :- रोहा तालुक्यातील जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, भुवनेश्वर (रोहा) यांचा ३१ वा वर्धापनदिन संस्थेच्या कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सहकार, विश्वास आणि पारदर्शकतेची परंपरा जपणाऱ्या या पतसंस्थेच्या वाटचालीचा गौरव करण्यासाठी पदाधिकारी, संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पांडुरंग सरफळे (रावसाहेब) होते. यावेळी उपाध्यक्ष शंकरराव भगत, सचिव सुहास खरीवले, संचालक मनोहर मेहेतर, संदीप सरफळे, दीपक जाधव, जगदीश दामाणी, हेमंत राणे, महेश बामुगडे, सौ. सुलभा पवार, विनायक पवार, व्यवस्थापिका बंदिनी धनावडे, निता शिंगृत, विश्वास खेरटकर, किरण शिंगृत, रुपेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सचिव सुहास खरीवले यांनी उपस्थित पदाधिकारी व संचालकांचे स्वागत करत संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
मनोगत व्यक्त करताना दीपक जाधव, महेश बामुगडे, उपाध्यक्ष शंकरराव भगत व सचिव सुहास खरीवले यांनी सांगितले की, गेली ३१ वर्षे संस्था पारदर्शक व कुटुंबवत्सल पद्धतीने कार्यरत असून सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने कर्जपुरवठा केला जात आहे. यामुळे अनेक सभासद कुटुंबांची आर्थिक उन्नती होऊन त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. या यशामागे संचालक मंडळ, सभासद, कर्जदार व ठेविदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष पांडुरंग सरफळे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, त्यांच्या कार्यकर्तृत्व, कल्पकता व दूरदृष्टीमुळे रोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी संस्थेचे स्वतःच्या जागेत भव्य कार्यालय उभे राहिले आहे. सहकाराची भावना आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करता येतात, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच सहकारी पतसंस्थेच्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, नियम १९६१ व नियामक मंडळाच्या सूचनांनुसार संस्थेचा कारभार काटेकोरपणे चालविला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी बंदिनी धनावडे व निता शिंगृत यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच कार्यक्रमादरम्यान निता शिंगृत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी संचालक मंडळाने भविष्यातही संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवत ग्राहकांचे हित जपण्यासाठी आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहात व सहकारभावनेने संपन्न झाला.



Comments
Post a Comment