ब्रेकिंग न्यूज
🚨 डॉ. सचिन पोरे आणि इंजि. महेश चव्हाण यांची रायगड जिल्हा पर्यावरण समितीवर 'तज्ज्ञ' म्हणून नियुक्ती... 🚨 अखिल भारतीय पोलीस टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचा ऐतिहासिक विजय; आरपीएफवर मात करत पटकावले विजेतेपद... 🚨

कर्तव्यदक्षता आणि जनसेवेचा गौरवशाली प्रवास पूर्ण

कार्यकारी अभियंता श्रीकांत गणगणे सेवानिवृत्त

रोहा-रायगड, दि. ३१ (संदीप सरफळे) :- रायगड जिल्ह्याच्या विकासाचा कणा अधिक मजबूत करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला, अशा एका 'लोकाभिमुख' आणि अत्यंत कर्तबगार अधिकाऱ्याचा शासकीय प्रवास आज अत्यंत भावूक वातावरणात पूर्ण झाला. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) कार्यकारी अभियंता श्रीकांत गणगणे हे प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सेवानिवृत्त झाले असून, महाड येथे आयोजित त्यांच्या निरोप समारंभात भावनांचा महापूर लोटलेला पाहायला मिळाला.

​श्रीकांत गणगणे यांचा हा प्रवास केवळ शासकीय सेवा नसून तो जनसेवेचा एक आदर्श वस्तुपाठ ठरला आहे. १९९६ च्या 'एमपीएससी' बॅचचे अधिकारी असलेल्या गणगणे यांनी आपल्या कारकिर्दीची यशस्वी सुरुवात नॅशनल हायवे विभागातून केली. विशेषतः मुंबई-गोवा महामार्गासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जमीन संपादन आणि व्हॅल्यूएशनचे काम अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. मात्र, हे किचकट व जबाबदारीचे काम त्यांनी आपल्या कौशल्याने आणि संयमाने अत्यंत लिलया पेलले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अभियंता म्हणून काम करताना त्यांनी रायगडच्या दुर्गम वाड्या-वस्त्यांपासून ते शहरांपर्यंत रस्ते आणि पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली.

​केवळ कार्यालयात बसून कागदपत्रे हाताळणारा अधिकारी अशी त्यांची ओळख कधीच नव्हती. उलट, जिल्ह्यावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले, तेव्हा श्रीकांत गणगणे यांनी प्रत्यक्ष 'फिल्ड'वर उतरून मदत आणि पुनर्वसनाच्या कामात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या या संकटकालीन तत्परतेमुळे जिल्हा प्रशासनाला मोठे बळ मिळत असे. कामाचा दर्जा आणि तांत्रिक अचूकता या दोन गोष्टींशी त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही तडजोड केली नाही, ज्यामुळे त्यांची प्रशासकीय वर्तुळात एक 'शिस्तप्रिय आणि पारदर्शक' अधिकारी म्हणून प्रतिमा निर्माण झाली.

​राजकीय विचारधारेचे मतभेद बाजूला सारून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी सलोख्याचे संबंध जोपासणे आणि सामान्य जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, हे त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य राहिले. तब्बल २३ वर्षे रायगड जिल्ह्यात सेवा दिल्याने या मातीशी आणि इथल्या माणसांशी त्यांचे एक अतूट नाते निर्माण झाले होते. महाड येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात उपस्थित वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांना 'लोकसेवेचा कर्मयोगी' म्हणून गौरविले.

​या निरोप समारंभाला उत्तर देताना श्रीकांत गणगणे हे कमालीचे भावूक झाले होते. रायगड जिल्ह्याने मला जे प्रेम दिले आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी पावलोपावली जी साथ दिली, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे, असे सांगताना त्यांनी हे ऋणानुबंध भविष्यातही कायम राहतील अशी ग्वाही दिली. त्यांच्या सेवानिवृत्तीने रायगडच्या प्रशासकीय क्षेत्रात एका कार्यक्षम युगाचा समारोप झाला असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog