ब्रेकिंग न्यूज
🚨 पुणे पोलिसांचा बुधवार पेठेत मोठा दणका! अल्पवयीन मुलीची सुटका करत १५ बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात🚨

समाजपरिवर्तनाचा महामेरू

बेणसे येथील 'सम्यक' सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चंद्रकांत अडसुळे यांचा सेवायज्ञ अविरत सुरू

बेणसे-​रायगड, दि. २९ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सिद्धार्थनगर-बेणसे येथील सामाजिक बांधिलकी जपत परिवर्तनाची नवी पहाट निर्माण करणाऱ्या संस्थामध्ये बेणसे येथील 'सम्यक' सामाजिक संस्थेचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जात आहे. या संघटनेचे ध्येयवेडे अध्यक्ष श्री. चंद्रकांत अडसुळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत सुरू असलेला कार्याचा आलेख थक्क करणारा असून, त्यांच्या या निस्पृह सेवेमुळे संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या चंद्रकांत अडसुळे यांनी सम्यक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील शोषित आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी दरवर्षी राबविण्यात येणारे शालेय साहित्य वाटप असो वा उच्च शिक्षणासाठी मिळणारे मार्गदर्शन, अडसुळे यांनी सदैव विद्यार्थीहिताला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे बेणसे आणि आसपासच्या वाड्या-वस्त्यांमधील अनेक युवक आज आत्मविश्वासाने प्रगतीची शिखरे सर करत आहेत.

​केवळ शिक्षणच नव्हे, तर आरोग्य क्षेत्रातही संस्थेचे मोठे योगदान दिले आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवणे कठीण असते, ही बाब ओळखून अडसुळे यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.तसेच त्यांनी स्वतः २६ वेळेस रक्तदान केले आहे.आपत्कालीन परिस्थितीत गरजू रुग्णांना रक्ताची किंवा औषधांची मदत मिळवून देण्यासाठी ते स्वतः अहोरात्र तत्पर असतात. संविधानाचा प्रचार आणि प्रसार हा त्यांच्या कार्याचा मुख्य कणा असून, ते बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची मशाल घराघरांत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने प्रबोधनात्मक व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करत असतात.

​चंद्रकांत अडसुळे यांच्या कार्यपद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन. समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन, जातीय सलोखा राखत गावाचा आणि परिसराचा विकास साधणे हाच त्यांचा एकमेव ध्यास आहे. स्थानिक नागरी समस्या असोत वा प्रशासकीय कामांमधील अडथळे, अडसुळे यांनी नेहमीच आक्रमक पण संयमी भूमिकेतून पाठपुरावा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. बेणसे येथील 'सम्यक' सामाजिक संस्था आज केवळ एक संस्था न राहता दीनदलितांचा आधारवड बनली असून, चंद्रकांत अडसुळे यांचे हे कार्य आगामी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog