नेतृत्व गुण आणि समाजहिताची ओढ
रोहा तालुक्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले श्री. दिनेश चांगू मोरे
रोहा, दि. ३० (किरण मोरे) :- रायगड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे रोठ खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश चांगू मोरे यांचे नाव आज आदराने घेतले जाते. केवळ राजकीय नेता म्हणून नव्हे, तर सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा हक्काचा माणूस अशी त्यांची ख्याती आहे. दिनेश मोरे यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात रोठ खुर्द ग्रामपंचायतीला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले असून त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकाळ हा ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण प्रगतीचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांनी सत्तेत असताना केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. २०१९-२०२० मध्ये मातोश्री बाळासाहेब ठाकरे योजना अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करून आणण्यापासून ते गावातील तरुणांसाठी व्यायामशाळा इमारत व आधुनिक व्यायाम साहित्याची उपलब्धता करून देण्यापर्यंत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्याच कार्यकाळात ग्रामपंचायतीमध्ये घंटा गाडी आणून त्यांनी स्वच्छतेचा प्रश्नही मार्गी लावला.
दिनेश मोरे यांच्या कामाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सरपंच असताना अनेक विकासकामे मंजूर करून आणली, परंतु ती कामे स्वतः न करता गावातील गोरगरिबांना व गरजू हातांना दिली. सत्तेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी न करता गावातील गरिबांच्या रोजगारासाठी करणारा असा निस्पृह सरपंच संपूर्ण रायगड जिल्ह्यात होणे नाही, अशा भावना जनमानसातून व्यक्त होत आहेत. ग्रामीण भागातील सर्वात मोठी समस्या असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांनी जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्याचबरोबर गावातील अंतर्गत रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था आणि पथदिप लावून गावाला आधुनिक रूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. शिक्षणाप्रती असलेली त्यांची ओढ वाखाणण्याजोगी असून, त्यांनी मराठी शाळा डिजीटल केल्या. तसेच जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
राजकारणापलीकडे जाऊन दिनेश मोरे यांचा सामाजिक वावर अत्यंत दांडगा आहे. रोहा तालुक्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. 'माणूस जोपासणे' ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू असून, आज त्यांच्याभोवती तरुणांचा मोठा संच उभा आहे. त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवला आहे. निगर्वी स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ते लोकप्रिय झाले आहेत. आगामी काळातही त्यांच्या मार्गदर्शनाने परिसराच्या विकासाचा रथ असाच वेगाने पुढे जाईल, असा विश्वास विभागातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Comments
Post a Comment