११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक!
अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी
३४.५ टन कचरा स्वच्छ केला
रोहा (संदीप सरफळे) :- महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहीमेत श्री सदस्यांनी रोहा शहर चकाचक साफ केले. यात ११४१ श्री सदस्यांसोबत १२८ सरकारी अधिकारीही सहभागी झाले होते. शहरातील तब्बल ३४.५ टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावल्याने शहरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. सदर कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये नेऊन त्याची योग्य व्हिलेवाट लावण्यात आली. स्वच्छता अभियानात रोह्यातील सर्व रस्त्यांसह, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, १२ सरकारी कार्यालये, इत्यादी ठिकाणी साफसफाई करण्यात आली. हे स्वच्छता अभियान म्हणजे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे केलेले विनम्र अभिवादन आहे. या अभियानात नगरपालिकेच्या ट्रॅक्टर, टेम्पो, पिकअप, घंटागाडी आदी वाहनांचा वापर करून एकूण ३४.५ टन कचरा गोळा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, न्यायमूर्ती संदीप खैरे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, वन अधिकारी शैलेशकुमार जाधव, पोलिस एपीआय रुपाली पाटील, पालिकेचे सभापती, उपसभापती, नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी आदींनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेऊन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली अर्पण केली.

Comments
Post a Comment