खोपोली (दिनकर भुजबळ) :- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, भावनिक समज आणि सामाजिक भान विकसित व्हावे, या हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खोपोली शाखेतर्फे विद्यार्थ्यांसाठी “दिल, दोस्ती, दुनियादारी” हा संवेदनशील आणि विचारप्रवर्तक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते ९:३० या वेळेत हा उ पक्रम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद शाळा व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथे इयत्ता ११ वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सरचिटणीस आरती नाईक या संवादक म्हणून उपस्थित होत्या.
संवादादरम्यान रिलेशनशिप, ब्रेकअप, लव्ह अॅट फर्स्ट साइट यांसारख्या तरुणाईला भेडसावणाऱ्या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करण्यात आली. प्रेम आणि आकर्षण यातील सूक्ष्म फरक स्पष्ट करताना, प्रपोजल कसे हाताळावे, प्रेमात असताना कोणत्या बाबींबाबत सजग राहावे, नकार कसा द्यावा आणि नकार स्वीकारताना मानसिक संतुलन कसे राखावे, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. एकतर्फी प्रेमातून उद्भवणारे तणाव, हिंसक प्रवृत्ती, तसेच मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्त्व यावरही परखडपणे भाष्य करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण ४० विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंद शाळेच्या चेअरपर्सन आसावरी दंडवते आणि मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गायकवाड, खोपोली शाखा कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, आणि शाखा प्रधानसचिव महेंद्र ओव्हाळ यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रभावी संयोजनासाठी विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह दयानंद पोळ, महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह प्रतिभा मंडावळे, तसेच सांस्कृतिक विभागाच्या कार्यवाह ज्योती भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संवाद साधत त्यांना परिपक्व, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनवण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले.
खोपोलीत विद्यार्थ्यांसाठी ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’ संवाद

Comments
Post a Comment