अलिबाग, दि. ३० (प्रतिनिधी) :- जिल्हा रूग्णालय अलिबाग येथील डॉक्टरांकडून अपंगांसोबत होणारी वागणूक हा सध्या चर्चेचा विषय बनून राहिला असून येथील डॉक्टरांना जास्तच माज चढल्याची संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी उच्चस्तरिय तक्रारी दाखल झालेल्या असून मुख्यमंत्री कार्यालयातून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अपंग रूग्णांसोबत दुश्मनाप्रमाणे वागणारे जिल्हा रूग्णालय अलिबाग येथील डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात अडकले असून या डॉक्टरांनी "लाज" सोडलीय का? हे डॉक्टर "चिरीमीरी" साठी अपंगांची अडवणूक करतात का? अशा अनेक संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे सिव्हील सर्जन यांचे नियंत्रण नसल्यामुळे येथील डॉक्टरांना जास्तच माज आल्याचे दिसून येत आहे. येथे दर बुधवारी अपंग रूग्ण तपासणीसाठी येतात परंतु येथील डॉक्टर हे त्यांच्या मर्जीतील (वशील्यावर आलेल्या) अपंगांना प्राधान्य देत असून इतर अपंग रूग्णांना कारणे सांगून हेलपाटे मारायला लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे.
जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे 'फिजीओथेरपी व ओक्युपेशनल थेरपी विभाग' (१४ नंबर) येथे दर बुधवारी अपंग रूग्णांची तपासणी केली जाते. एक महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या विभागातील डॉक्टर हे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचे कृत्य करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. येथे तपासणीसाठी आलेल्या अपंगांना अपमानास्पद वागणूक देऊन डॉक्टरांकडून त्यांची अडवणूक केली जात असल्याचा निंदनीय प्रकार येथे घडलेला आहे. येथे आलेल्या अपंग रूग्णांना पायाने व्यवस्थित चालता येत नाही, ते पायाने अपंग आहेत हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहून देखील येथील डॉक्टर अपंगांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना तपासणीसाठी वारंवार हेलपाटे मारायला लावीत असल्याचे दिसून आलेले आहे. रायगड जिल्हा रूग्णालय अलिबाग येथील कार्यपद्धतीवर जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न येथे उपस्थित झालेला असून अपंगांना त्रास देणाऱ्या येथील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्हा रूग्णालय अलिबाग येेथील डॉक्टरांच्या उच्चस्तरिय चौकशीचे आदेश
अपंगांची अडवणूक करणाऱ्या डॉक्टरांचा माज उतरणार!
डॉक्टरांचीच होणार चौकशी

Comments
Post a Comment