तटकरेंच्या बालेकिल्ल्यात ‘सातनाक विरुद्ध चौगुले’ जोरदार थेट लढत
  श्रीवर्धन निवडणूक तापली!  

श्रीवर्धन (सोपान निंबरे) :-  नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होत असून तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र सातनाक आणि शिवसेनेचे ॲड. अतुल चौगुले यांच्यात थेट संघर्ष रंगणार आहे. मंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे सातनाक यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत, तर चौगुले हे स्थानिक जनाधार, तरुणांचा वाढता पाठिंबा आणि संघटनबळ यांच्या जोरावर राष्ट्रवादीसमोर भक्कम आव्हान उभे करत आहेत.
दरम्यान, निवडणूक तापत असताना काही पक्षाकडून मोठ्या प्रमाणात मटण मेजवानी, वाढीव पॅकेज आणि विविध प्रकारचे आकर्षक लाभ देऊन मतदारांना प्रभावित करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा शहरात जोरात आहे. महिला-पुरुष मंडळांच्या पारंपरिक पॅकेजचा आकडा तब्बल दुपटीने वाढल्याने हे लोभाचे डाव अधिक स्पष्टपणे उघड झाले आहेत.
याबाबत नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत असून, "या मेजवाण्यांना आणि लोभाच्या पॅकेजांना बळी न पडता शहराच्या विकासासाठी योग्य आणि प्रामाणिक निर्णय घ्यावा," अशी हाक स्थानिक सुजाण मतदारांमधून दिली जात आहे. श्रीवर्धनचा विकास, पाणी-रस्ते-स्वच्छता- आरोग्य शेवा शिक्षण, रोजगार यांसारख्या शहरातील रखडलेल्या सर्वांगीण मूलभूत प्रश्नांचा विचार करून मतदान करणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
राजकीय महाशक्ती विरुद्ध स्थानिक जनाधार अशी रंगलेली ही लढत आता श्रीवर्धनच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog