रोहा अष्टमी बँकेच्या इमारतीचा लिलाव रद्द

टीकेची झोड उठवताच सरकारला खडबडून जाग

फेरनिविदा काढण्याचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश


रोहा (प्रतिनिधी) :- कवडीमोल भावात रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत व जमीन फुकण्याचा डाव अखेर उधळला गेला आहे. झोलझपाटा करून होत असलेल्या या लिलावाविरोधात रोहेकरांनी आवाज उठवत या विक्रीला विरोध केला होता. तसेच प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच सरकारला खडबडून जाग आली. त्यानंतर राज्याच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी बँकेचा लिलाव रद्द करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले असून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत व जमिनीचा कस्टोडियनने कवडीमोल भावाने लिलाव करण्यास नागरिकांनी विरोध केला होता. सर्वपक्षीयाच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली. तसेच बँक मुख्यालय विक्री करताना विश्वासात न घेतल्याने ठेवीदारांमध्येही प्रक्षोभ उसळला होता. लिलाव प्रक्रियेत कुठल्याही कंपनीने भाग घेतला नव्हता. बँकेच्या खात्यात टेंडर फॉर्म विकत घेणाऱ्या कुठल्याही निविदाधारकांचे पैसे जमा झाले नव्हते. तसेच इसारा रक्कमही जमा झाली नव्हती. त्यामुळे या विक्री प्रकरणात काहीतरी काळेबेरे सुरू असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला होता. याबाबत प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसिद्ध करत वाचा फोडली. त्यामुळे सरकारने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा

कस्टोडियनने मुदत संपल्यानंतर निविदा प्रक्रिया केली. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून राज्याच्या अवर सचिव यांनी जिल्हा उपनिबंधकांना रोहा अष्टमी अर्बन बँक विक्री लिलाव व विक्रीचा संपूर्ण व्यवहार तत्काळ रद्द करून पुनर्लिलाव करावा असे आदेश दिले आहेत. या कार्यवाहीचे स्वागत करतानाच आक्रोश समितीचे समीर शेडगे, नितीन परब आणि अमित घाग यांनी या लिलाव प्रक्रियेत अनियमितता करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog