रोह्याचे मिलिंद अष्टीवकर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४५ वे अध्यक्ष
रोहा (विशेष प्रतिनिधी) :- रोह्याचे मिलिंद अष्टीवकर यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाली. १ सप्टेंबर रोजी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. पुढील दोन वर्षे अष्टीवकर परिषदेचं नेतृत्व करणार आहेत. १८ वर्षांनी रायगड कडे परिषदेचे नेतृत्व दुसऱ्यांदा येत आहे, यापुर्वी सुप्रिया पाटील यांनी परिषदेचे अध्यक्ष पद भूषविले आहे. आता अष्टीवकर २०२४ ते २०२६ या कालावधीत अध्यक्ष रहातील.
मिलिंद अष्टीवकर गेली २० वर्षे पत्रकारितेत सक्रीय आहेत. रायगड प्रेस क्लबचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. यापुर्वी मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव, परिषदेचे कोषाध्यक्ष आणि नंतर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा, आणि चळवळीशी नातं सांगणारा कार्यकर्ता पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक सामाजिक चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध आला आहे. मुंबई गोवा महामार्ग, पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकारांवरील हल्ल्याच्या विरोधात परिषदेने उभारलेल्या लढ्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. परिषदेचे नेते एस.एम. देशमुख, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मावळते अध्यक्ष शरद पाबळे यांनी मिलिंद अष्टीवकर यांना शुभेच्छा दिल्या.