साई बौद्ध विकास मंडळाच्या उपोषणाला यश; अनाधिकृत बांधकाम तोडण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही

माणगांव (उत्तम तांबे) :- माणगांव तालुक्यातील साई बौद्धवाडी येथील बौद्ध समाजाच्या मालकीच्या जागेत अनाधिकृत अंगणवाडी करता बांधकाम करण्यात आले होते. १८ जानेवारी २०२४ रोजी सदर अनाधिकृत बांधकामाला सुरुवात केली असता त्यावेळी तेथील ग्रामस्थ त्या ठिकाणी विचारपूस करिता गेले असता साई ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करून धमकावले होते या प्रकाराबाबत माणगाव पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी न्याय मागण्याकरिता तक्रार दाखल केली होती. तसेच याबाबत अंगणवाडी संबंधित कार्यालयाला तक्रार पत्र सादर केले होते. सदरची अंगणवाडी बांधण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने साई बौद्धवाडीतील ग्रामस्थांना विश्वासात न घेता, साई ग्रामपंचायत उपसरपंच यांनी बौद्ध समाजाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते. 

ग्रामपंचायतच्या कोणताही ठराव नसताना सदर बांधकामाबाबत निविदा जाहीर न करता, जागेबाबत सहमती न घेता सदर ठेकेदारांनी अंगणवाडी बांधकाम सुरू केले होते. सदर अनधिकृत बांधकामाबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थ निवेदन देत होते परंतु संबंधित असणारे अधिकारी बेजबाबदारपणे उत्तरे देत होती. तसेच ठेकेदार पुढाऱ्यांना मध्यस्थी करून सदर प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या नोकरीवर परिणाम होऊ नये म्हणून राजकीय प्रतिनिधी यांच्याद्वारे साई ग्रामस्थांना दबावाखाली घेत होते. सदर अनाधिकृत बांधकाम तोडून बौद्ध समाजाची जागा रिक्त करून मिळावी तसेच याबाबत चौकशी करून कार्यवाही व्हावी अशी मागणी साई बौद्ध वाडीतील ग्रामस्थांची होती. याबाबत मा. विजय वडडेटिवर, विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई तसेच मा. कार्यकारी अधिकारी बांधकाम विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग व मा . गटविकास अधिकारी पंचायत समिती माणगाव बरोबर संबंधित अधिकाऱ्यांना दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी साई ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. परंतु साई बौद्धवाडी ग्रामस्थांवर संबंधित अधिकारी व साई ग्रामपंचायत राजकीय दबाव यंत्रणाचा वापर करून त्रास देत होती. या अनधिकृत बांधकाम संदर्भात  १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनी न्याय मिळण्याकरिता पंचायत समिती माणगावच्या आवारात साई ग्रामस्थ बेमुदत उपोषणास बसले होते. या उपोषणास बौद्ध समाजाच्या अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता तसेच बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगावचे विद्यमान तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे व तालुका कमिटी यांनीही या सदर आंदोलनाला पाठिंबा देऊन अन्यायविरुद्ध संताप व्यक्त केला. या अन्यायाच्या विरोधात साई बौद्ध ग्रामस्थ पंचायत समितीच्या आवारात १५ ऑगस्ट २०२४ रोजी उपोषणाला बसणार असल्याचे पत्र माणगाव गट विकास अधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र असे असताना देखील त्यादिवशी माणगाव गट विकास अधिकारी अनुपस्थित राहिल्याने आंदोलन करते व कार्यकर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. माणगाव गट विकास अधिकारी उपस्थित नसल्याने सदर तेथील चार्ज जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता संजय सूर्यवंशी यांच्याकडे असल्याने उपस्थित पत्रकारांनी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन सदर अन्यायाविरुद्ध साई ग्रामस्थांना न्याय मिळण्याकरता वारंवार चर्चा चालू होती. यावेळी गटविकास अधिकारी माणगाव यांची संपर्क साधला असता ते तळा येथे मंत्र्यांच्या कार्यक्रमात असल्याने त्यांना यायला वेळ लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंतायांनी सदरील जागेचे मूळ मालक कोण आहे याची माहिती मागितली आहे. ती माहिती मिळण्याकरिता पंधरा दिवसाची मुदत मिळावी तो पर्यंत ग्रामस्थांनी उपोषण मागे घ्यावे अशी सुर्यवंशी यांनी विनंती केली. परंतु सूर्यवंशी यांच्या विनंतीला न जुमानता ग्रामस्थांनी उपोषण चालूच ठेवले होते. दरम्यान आंदोलनातील उपोषणाला बसलेल्या भारती दाजी पवार यांची तब्येत खालवली होती. त्या चक्कर येऊन पडल्यामुळे तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले. कालांतराने आंदोलन जास्त पेटले होते. 

बौद्धजन पंचायत समिती माणगाव समवेत विविध संघटनेचे कार्यकर्त्यांनी या अन्याय विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला होता . दरम्यान सायंकाळी अखेर सदस्थितीत सदर विषय मा. मुख्यकार्यकारी अधिकारी प्रलंबित असल्याने आज मीतीस पंचायत समिती स्तरावर निर्णय घेणे शक्य होत नाही. तरी सदर विषयाबाबत आम्ही पाठपुरावा करून साई येतील बौद्धवाडी समाजाच्या जागेवरील अनाधिकृत बांधकाम एक महिन्याच्या आत तोडून देण्याची ग्वाही देत आहोत असे विनंती पत्र सुर्यवंशी यांनी आंदोलकांना सादर केले. सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता सूर्यवंशी यांनी बौद्ध विकास मंडळाचे सचिव  मंदार मोरे यांना पाणी प्राशन करून, साई बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष हरेश मोरे यांनी उपोषण स्थगित केले. यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे उपअभियंता सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी, ग्रामस्थांचे व विशेष करून पत्रकार बांधवांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.

Popular posts from this blog