रोह्यात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे २५ वे शिबिर संपन्न 

दोन वर्षांत १५०० जणांना मिळाली नवी दृष्टी

शंकरा आय हॉस्पिटलच्या टीमचा गौरव

रोहा, दि, ७  (प्रतिनिधी) :- रोहा येथे सोमवारी नेत्ररुग्ण तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यात १२० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोतीबिंदू आढळलेल्या ३० रुग्णांची आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. रोहा सिटिझन फोरम ट्रस्टच्या माध्यमातून महिन्याच्या पहिल्या सोमवारी  मोफत नेत्ररुग्ण तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येते. सोमवारी श्री धावीर महाराजांच्या प्रांगणात झालेले हे २५ वे शिबिर होते. रोहा सिटिझन फोरमने दोन वर्षांत २५ शिबिर आयोजित करुन १५०० रुग्णांना नवी दृष्टी प्राप्त करून दिली. रुग्णांप्रती आपुलकीची भावना ठेवून सामाजिक व लोकहितकारी कार्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या रोहा सिटिझन फोरमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आयोजित केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे टिम मॅनेजर प्रकाश पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकी जपत शिबिरासाठी विशेष योगदान देणाऱ्या समिधा अष्टिवकर, दिनेश जाधव, दिनेश मोहिते व बिलाल मोर्बेकर यांनासुद्धा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब यांनी निसर्ग चक्रिवादळ, तोक्ते चक्रिवादळ, कोरोना महामारी, लॉकडाऊनचा काळ तसेच महाड आणि चिपळूण येथील महापूर इत्यादी प्रसंगी रोहा सिटिझन फोरमने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ट्रस्टचे विश्वस्त आणि मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, "रोहा सिटिझन फोरमने गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी वृत्तीने काम केले आहे. त्यामुळे रोहा तालुक्यातील नागरिक या ट्रस्टकडे विश्वासाने पहातात. कुठल्याही संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी संस्थेचे नेतृत्व सक्षम असावे लागते, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब यांच्याकडे माणसं जोडायची आणि नातं टिकवायचे उपजत कौशल्य आहे, त्यामुळे समिधा अष्टिवकर, दिनेश जाधव, दिनेश मोहिते, बिलाल मोर्बेकर यांच्यासारखे अनेकजण त्यांच्या सहकार्यासाठी कायम उभे राहिलेले पहायला मिळतात. आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचेही त्यांनी आभार मानले. तर प्रकाश पाटील यांनी हॉस्पिटलच्या वतीने त्यांच्या कार्याची माहिती दिली.
या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ. ईशा निगुटकर, सिद्धी मोरे, अक्षता चिकणे, नेत्रा महाडीक, विश्वनाथ पाटील, सागर पाटील आदींनी रुग्णांची तपासणी केली. रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट चे अध्यक्ष नितीन परब, प्रदिप देशमुख, मिलिंद अष्टिवकर, दिलीप वडके, श्रीकांत ओक, अहमदशेठ दर्जी, उस्मानभाई रोहेकर,  संतोष खटावकर, महेश सरदार, संदीप सरफळे, इल्यास डबीर, दिनेश जाधव, शैलेश रावकर, सचिन शेडगे, परशूराम चव्हाण, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, निलेश शिर्के, सिद्देश ममाले, दिनेश मोहिते, समिधा अष्टिवकर, रिद्धी बोथरे, भावेश अग्रवाल, बिलाल मोर्बेकर आदी फोरम च्या सर्व सदस्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Popular posts from this blog