पूररेषेतील बांधकाम परवानगी विरोधात जितेंद्र दिवेकर यांची कोर्टात धाव

रोहा (विशेष प्रतिनिधी) :- रोह्याच्या कुंडलिका नदीच्या काठावर पुररेषेच्या हद्दीत विकासकांनी उच्छाद मांडला आहे. रोहा तालुक्याला बेकायदा इमारतींमुळे पुराचा धोका वाढतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीकिनाऱ्यासह, पूररेषेतील बेकायदा व्यावसायिक बांधकामाच्या परवान्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. जलसंपदा विभागाने कुंडलिका नदीच्या पात्रात तसेच पात्रालगत पूररेषा निश्चित केल्यानंतर या परिसरात कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक बांधकाम उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे.  विशेषतः रोहा नगरपरिषद व रोहा कोलाड रस्त्यालगत विकासकांकडून टॉवर इमारतींचे बांधकाम पुररेषेत सुरू असल्याने  सामाजिक कार्यकर्ते, मा. उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी जिल्हाधिकारी रायगड, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड, रोठ ग्रामपंचायत आणि कर्मा कन्स्ट्रक्शन यांच्याविरोधात माणगांव येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे.

मा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने नदीच्या पात्रात तसेच पात्रालगत पूररेषा निश्चित केल्यानंतर महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपरिषदा यांनी पुररेषेपासून किमान काही अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारचे बांधकाम उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही रोहा कोलाड रस्त्यालगत कर्मा कन्स्ट्रक्शन या विकासकांकडून टॉवर इमारतींचे बांधकाम पुररेषेत (ब्ल्यू लाईन) सुरू असल्याने  सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र दिवेकर यांनी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड यांच्याकडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु पाटबंधारे विभागाकडून कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे रायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांच्या मनमानी कारभाराविरोधात दिवेकर यांनी माणगांव येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. 

धनदांडगे व्यावसायिक कुंडलीका नदीला विद्रूप करत असून परिसरात पुराचा धोका वाढतो आहे, यामुळे रोहा तालुक्यातून दिवेकर यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे, मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाटबंधारे विभागाचे धाबे दणाणले आहेत.

Popular posts from this blog