औद्योगिक विद्यालय धाटाव येथे भव्य व सुसज्ज लॅब चे उद्घाटन
प्रतिनिधी : सदानंद तांडेल
ह्युबॅक कलरंटस इंडिया लिमिटेड कंपनी कडून धाटाव विद्यालयाला सुसज्ज अशी सायन्स लॅब तयार करून देण्यात आली. या लॅबचे भव्य असे उद्घाटन सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा गीताताई पालरेचा तसेच ह्युबॅक कलरंटस इंडिया लिमिटेडचे सी एस आर प्रतिनिधी पराग फुकणे व निलीकॉन फूड डाईज लिमिटेडचे एच आर मॅनेजर गजानन बामणे तसेच सिद्धिविनायक इंटरप्राईजेस चे उदय पाटील व सिद्धी भगत यांच्या हस्ते करण्यात आले. औद्योगिक विद्यालय धाटाव चे मुख्याध्यापक एस आर तिरमले यांच्या प्रयत्नाने या विद्यालयाला सुसज्ज व सर्व साहित्यासह लॅब पराग फुकणे यांनी कंपनीमार्फत सी एस आर फंडातून उपलब्ध करून दिली. या लॅब चे काम सिद्धिविनायक इंटरप्राईजेस लिमिटेड यांनी अतिशय सुंदर प्रकारे व लवकर पूर्ण केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गीताताई पालरेचा यांनी येथील मुख्याध्यापक एस आर तिरमले यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल कौतुक केले तसेच सर्व कंपनीचे प्रतिनिधी यांचेही मनापासून ऋण व्यक्त केले व अशाच प्रकारचे सहकार्य येथील विद्यार्थ्यांना व विद्यालयाला करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून काही प्रश्न विचारून जीवनात आपण कशाला महत्त्व द्यायचे याचे आपणच ठरवलं पाहिजे व इनडोअर गेम पेक्षा आउटडोर गेम ला जास्त महत्त्व द्या असे सर्वांना सांगितले. कंपनीचे सीएसआर प्रतिनिधी पराग फुकणे यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यास व खेळ यांच्या बद्दल अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले. निलीकॉन फूड डाईज लिमिटेड कंपनीचे एच आर मॅनेजर गजानन बामणे यांनीही सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यालयाचे ते आल्यापासून कोणकोणती कामे झाली व ती कशी पूर्ण करून घेतली यामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोलाचे सहकार्य आपल्याला केले व इथून पुढेही येथील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विकासासाठी जे जे आवश्यक असेल ते ते येथील कंपन्यांच्या माध्यमातून आपण मिळवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन संस्थेच्या कार्याध्यक्षा गीताताई पालरेचा यांना दिले.