रोह्यातील श्री धावीर मंदिर मार्गाचा भूसंपादनाचा तिढा सुटला
नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्या शिष्टाईला यश; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
रोहा, दि. २८ (संदीप सरफळे) :- रोहा शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री धावीर महाराजांच्या मंदिर मार्गावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे यांची श्री धावीर देवस्थान ट्रस्टवर पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे आणि यशस्वी शिष्टाईमुळे हा गुंता सुटला असून, यामुळे मंदिर ट्रस्ट आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आह
गेल्या अनेक वर्षांपासून फिरोज टॉकीज ते श्री धावीर मंदिर या सुमारे ७०० मीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम रखडले होते. या मागणीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच ४० लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाचे लोकार्पणही करण्यात आले. हा रस्ता केवळ गौलवाडी गावाला जोडणारा मुख्य मार्ग नसून, श्री धावीर महाराजांच्या पालखी मार्गाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्याला धार्मिक व सामाजिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. पूर्वी हा मार्ग पायी वहिवाटीसाठी वापरला जात असताना तो थेट देवस्थानच्या मालकीच्या मोकळ्या जागेतून तयार करण्यात आला होता. यामुळे देवस्थानच्या जागेचे दोन भाग झाले होते आणि सुमारे सतरा गुंठे क्षेत्र रस्त्यामुळे बाधित झाले होते. रस्त्यामुळे मंदिर परिसराला संरक्षक भिंत उभारणे कठीण झाले होते, ज्याचा परिणाम मंदिर परिसराच्या सुरक्षिततेवर होत होता.
या पार्श्वभूमीवर, नगरपालिकेने मंदिर ट्रस्टच्या जागेत नव्याने डांबरीकरण केल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. ही जागा पुन्हा ट्रस्टच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. या गंभीर प्रश्नाची दखल घेत नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी आणि देवस्थान ट्रस्ट यांची संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीत शहर विकास आराखड्यानुसार (DP Plan) रस्ता आता देवस्थानच्या प्रांगणाबाहेरून नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे आता देवस्थानची जागा पूर्णतः मोकळी होऊन चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहर विकास आराखड्यात दर्शविलेल्या नवीन मार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया नगरपालिकेने तात्काळ सुरू केली आहे. या जमिनीच्या मोबदल्यात संबंधित जमीनमालकांना 'टीडीआर'च्या माध्यमातून मोबदला देण्यात येणार असून, तशी कार्यवाही प्रशासनाने हाती घेतली आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या वेळी उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, गटनेते महेंद्र गुजर, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, निता हजारे, नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशमुख, उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या या जलद आणि सकारात्मक भूमिकेमुळे शहराच्या विकासासोबतच धार्मिक स्थळाची स्वायत्तता राखली गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.



Comments
Post a Comment