www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com

रोह्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

कोळी बांधवांनी सुरू केलेला गाझी शेख सलाऊद्दीनशा बाबांचा उर्स मंगळवारपासून उत्साहात

रोहा (संदीप सरफळे) :- रायगड जिल्ह्यातील सामाजिक सलोख्याचे आणि श्रद्धास्थानाचे केंद्र असलेल्या रोहा शहरातील हजरत गाझी शेख सलाऊद्दीनशा बाबांचा उर्स यावर्षी मंगळवारपासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या उर्स सोहळ्यासाठी केवळ रोहा शहरच नव्हे, तर मुंबई, पुणे आणि संपूर्ण राज्यभरातून भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून दर्गा परिसर भक्तीने न्हाऊन निघाला आहे.

​या उत्सवाचा ऐतिहासिक वारसा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात रेवदंडा येथील कोळी बांधव आपल्या मचव्यांतून व्यापारासाठी रोहा बंदरात येत असत. त्या काळात त्यांना या जागृत देवस्थानाची प्रचिती आल्याने, १९०९ साली रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी रेवदंड्याच्या कोळी बांधवांनी पुढाकार घेऊन हा पहिला उर्स साजरा केला होता. कोळी बांधवांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि अखंडपणे सुरू असून, सर्व धर्माचे नागरिक या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात.

​उर्साच्या निमित्ताने दर्गा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे ३० मार्च रोजी परंपरेनुसार धार्मिक विधी पार पडल्यानंतर भव्य 'संदल' मिरवणूक काढण्यात येणार आहे. या यात्रेचे स्वरूप आता व्यापक झाले असून, मुंबई आणि इतर भागांतून आलेल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने येथे थाटली आहेत. यात प्रामुख्याने घरगुती वापराच्या वस्तू, काचसामान, कपडे, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा समावेश आहे. तसेच मुलांसाठीचे आकाशपाळणे आणि खेळणी यांमुळे जत्रेला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.

​या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे दरवर्षी आयोजित केला जाणारा दर्जेदार कव्वालीचा कार्यक्रम. यावर्षी मंगळवारी रात्री आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कव्वाल चांद अफजल आणि रीना परवीन यांच्यामध्ये कव्वालीची जुगलबंदी रंगणार आहे. दिल्ली आणि जोनपूर येथील नामांकित कलाकारांना ऐकण्यासाठी जिल्हाभरातून रसिक या ठिकाणी हजेरी लावतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा उर्स कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

​तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता शेवटच्या दिवशी 'चिरागीचा उर्स' करून केली जाते, जो विशेषतः महिला भाविकांसाठी मर्यादित असतो. नुराजी परिवाराचे वंशज फकिरसाहेब नुराजी हे वंशपरंपरेने दर्ग्याची सेवा आणि पूजा-अर्चा पाहतात. उर्स कमिटीचे अध्यक्ष तय्यब अली मुमेरे यांनी सर्व भाविकांना हा उत्सव शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गर्दीचे नियोजन करण्यासाठी नगरपालिका प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष नदीम सिद्दीक, सचिव समीर दाखवे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.

Comments

Popular posts from this blog