टाटा विद्यालय भिरा येथील विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक बंदी अंतर्गत विविध कार्यक्रम
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगाव तालुक्यातील पाटणूस पंचक्रोशीतील टाटा विद्यालय भिरा च्या मराठी माध्यमाच्या 9 वी.10 वी च्या स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदिचा संदेश देण्यासाठी रॅली काढून व हातात फलक घेऊनत्यावर रोजच्या वापरात येणाऱ्या पास्टिक कॅरिबॅग व त्याचे दुष्परिणाम याचे संदेश लिहिण्यात आले होते. विळे येथील आठवडा बाजारात पाटणूस पंचक्रोशी, विळे पंचक्रोशी, भागाड एम. आय. डी. सी., तासगाव, बेडगाव, साजे, रवाळजे या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी साठी येत असतात.
या वेळी व्यापारी सामान खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला प्लास्टिक कॅरी बॅग देतात त्यामुळे हजारो कॅरी बॅग नागरिकांमार्फत घरोघरी येतात. ग्राहक या कॅरी बॅग कचरा कुंडीत टाकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक चा कचरा होतो आणि तो माती मिसळल्याने फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. व रोगराई पसरते यावर बंधन येण्यासाठी विद्यार्थ्यांनी ही रॅली काढली होती. व्यापाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या रॅलीचे स्वागत करून यापुढे आठवडा बाजारात ग्राहकांना प्लास्टिक कॅरी बॅग न देण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या रॅलीमध्ये वरचीवाडी विळे ग्रामपंच्यायतीचे सरपंच परशुराम कोदे, पाटणूसच्या सरपंच सौ. नीलिमा निगडे, डॉ. नितिन मोदी, डॉ. आंबेतकर, हि. म. मेथा विद्यालयाचे मुख्याध्यापक ठाकूर, शिक्षक वृंद, स्वदेश फाउंडेशन चे डायरेक्टर श्रीम. नीता हरमळकर, मॅनेजर श्रीम. सुश्मिता जैन,श्री बाळासो माने, श्री विनोद पाटील, कॉडिंनेटर शाम गिरकर डॉ. पाटील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्याचे वाटप करून जनजागृती केली.
या उपक्रमाची संकल्पना Dav पब्लिक इंग्लिश स्कूल भिरा शाळेच्या प्रिंसिपल श्रीम. श्रीकला नायर यांनी आमलात आणली तर त्यांना टाटा पॉवर भिरा चे चेअरमन अजय कोण्णूर यांनी मोलाचे सहकार्य केले. टाटा विद्यालय भिराचे स्काऊट शिक्षक एस. पी. सुर्वे व गाईड शिक्षिका शुभदा मांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्ग दर्शन केले.