कोलाडमध्ये मटका-जुगार चालू ठेवणे पोलीसांना महागात पडणार!
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल
अवैध धंद्यांमुळे कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर
रायगड : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील कोलाड येथे पोलीसांच्या आशीर्वादाने मटका-जुगार व ऑनलाईन चक्री जुगार राजरोसपणे सुरू असल्यामुळे याप्रकरणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, या तक्रारीची प्रत माहितीसाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनाही देण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने "पोलीस" हा महत्वाचा घटक समजला जातो. जनता जेव्हा-जेव्हा अडचणीत सापडते, तेव्हा-तेव्हा ती रक्षणासाठी पोलीसांकडेच धाव घेत असते. म्हणूनच पोलीसांना "जनतेचे रक्षक" असे म्हटले जाते. परंतु एखाद्या ठिकाणी जर पोलीसच अवैध धंद्यांची पाठराखण करून जनतेला त्रासदायक ठरत असतील तर...? हा तर "कुंपणाने शेत खाण्याचा" प्रकार आहे! असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड येथील अवैध चक्री जुगार व मटका जुगाराचे धंदे पाहता कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याने या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी उच्चस्तरिय तक्रार दाखल झाल्याने पुढील कारवाई काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.