भाजपा अध्यक्ष कैलास पायगुडे यांचा तडकाफडकी राजीनामा
तळा (संजय रिकामे) : तळा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्याकडे सुपूर्त केला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारला की नाही हे अजुन कळलेले नाही. परंतु पायगुडे यांच्या राजीनाम्यामुळे तळा तालुका भाजपाला हा जोरदार धक्का मानला जात आहे. अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तळा तालुक्यामध्ये पायगुडे यांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपाला अच्छे दिन आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीने कैलास पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढवली. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवारांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार उभे करण्याचे धाडस पायगुडे यांनी केले. निवडणुकीत भाजपाचे उमेदवार पराभूत झाले असले तरी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे समजुन पायगुडे यांनी हार मानली नाही. ग्रामपंचात निवडणुकीत गेली अनेक वर्षे गिरणे ग्रामपंचायतीवरील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता एक हाती उलथवुन त्यांनी तळा तालुक्यात पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आणली. अनेक ग्रामपंचायतीत त्यांनी भाजपाचे उमेदवार उभे केले. तर काही ग्रामपंचायतीत थेट उपसरपंच पदी भाजपाचे उमेवार निवडुन आणले. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आ. प्रशांत ठाकुर, आ. रविंद्र चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी छाप पाडली होती. तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, आधारभुत शासकीय भात खरेदी केंद्र ही ठळक कामे त्यांच्या कारकीर्दीत पार पडली आहेत.
कैलास पायगुडे हे अजातशत्रू म्हणुन तळा तालुक्यात परिचित आहेत. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे पक्षात इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरु होते. प्रशासकीय ज्ञान आणि अधिकारी वर्गावर वचक असल्याने विकासकामे लवकरात लवकर ते मार्गी लावत असत. गिरणे ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी करोडो रुपयांची विकासकामे मंजुर करुन यावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाकडून दिलेली जबाबदारी पार पाडत असताना त्याचप्रमाणे पक्षाला संजीवनी देत असताना अचानक त्यांनी राजीनामा दिला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी तळा तालुक्यामध्ये आता पाय रोवते आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे जर पायगुडे यांना राजीनामा द्यावा लागला असेल तर ते पक्षाच्या पध्यावर पडणार असल्याचे बोलले जात आहे. एक चांगलं नेतृत्व पक्ष गमावून बसेल अशी चर्चा सध्या रंगली असून तळा नगरपंचायत निवडणुकीवर याचा परिणाम होणार आहे. तुर्तास कैलास पायगुडे यांचा राजीनामा स्वीकारणार की त्यांची नाराजी दूर करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.