रोहा येथील मेढा वनविभागाचे वनपाल दिलीप सुर्यवंशी सेवानिवृत्त
रोहा (समीर बामुगडे) : रोहा वनविभाग अंतर्गत सुमारे 40 वर्ष अखंड वनपाल या पदावर सेवा बजावत असलेले दिलीप सुर्यवंशी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभाचे आयोजन कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले.
जनतेमध्ये व कर्मचाऱ्यांमधे अतिशय लोकप्रिय असलेले श्री. सुर्यवंशी हे 1983 मध्ये वनपाल म्हणून सरळ सेवेत रूजू झाले होते आणि 31 मे 2021 रोजी 39.5 वर्ष सेवा बजावूव त्याच पदावर निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जंगल व पशु पक्षांचे रक्षण करताना खुप महत्त्वपूर्ण कामगिरी केली. झाडांची चोरटी वाहतूक पकडली, वणवे लागु नये म्हणून जन जागृती केली, वन्यजीवांचे संरक्षण व्हावे म्हणून मेहनत घेतली व असंख्य झाडे वाढवली. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, असे सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. टी. शेळके यांनी केले यावेळी साहेबांच्या पत्नी मुलगी व कुटूंबियांसमवेत त्यांचा सत्कार करून व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी खारी येथील वनरक्षक सविता कदम या आपल्या भाषणात म्हणाल्या की, सूर्यवंशी साहेब हे कधीच रिटायर होऊ नयेत, त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सतत लाभावे, भविष्यात मलादेखील त्यांच्यासारखीच वन अधिकारी व्हायला आवडेल! अशा शब्दांत त्यांनी साहेबांचा गौरव केला. त्यानंतर प्रकाश अवसरे व अन्य कर्मचाऱ्यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. सुर्यवंशी म्हणाले की, मी आज जरी रिटायर होत असलो तरी मी कायम तुमच्याच सोबत असणार आहे. वनरक्षण हे एक पुण्यकर्म समजून मी आजवर सेवा बजावली याचा मला आनंद आहे! उपस्थित व पत्रकारांना जाताजाता एकच विनंती आहे की जंगलामध्ये असलेली माकडे त्यांची नैसर्गिक सवय व अधिवास सोडून अन्नासाठी रस्त्यावर भीक मागत असतात त्यांना ब्रेड बिस्किटे देऊ नका फारतर फळे द्या आणि त्यांना रस्त्यावरून त्यांच्या नैसर्गिक परिसरात पाठवा जेणेकरून पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही व निसर्गाचे खरे संवर्धन होईल तसेच बाहेर फिरायला जाताना सोबत झाडांच्या बीया घेऊन जा आणि सर्वत्र फेका म्हणजे झाडे वाढतील.
शेवटी शेळके यांनीच अभार मानले. सदर कार्यक्रमाला वनक्षेत्रपाल सचिन भांगरे, लेखपाल पी. ए. इनामदार,वनपाल एम. टी. शेळके, डी. डी. वारगुडे, एस. बी. चव्हाण, एस. जे. व्हटकर, एन. टी. वाघमारे, वनरक्षक अजिंक्य कदम आणि कार्यालयीन कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.