जयवंत मुंडे यांच्या तत्परतेमुळे नागोठण्यातील युवकाला मिळाला न्याय!
चुकीने दुसऱ्याच्या खात्यावर गेलेली रक्कम परत मिळविण्यात यश
रोहा (रविना मालुसरे) : कोरोना संसर्ग व लॉकडाऊनमुळे सध्या सर्वजण त्रस्त झालेले आहेत. सगळ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, हे कमी म्हणून की काय तर एका युवकाला दुहेरी संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागोठणे येथील रहिवासी कु. मुजाहिद मुजावर यांच्या बँक ऑफ इंडिया शाखा नागोठणे येथील बँक खात्यावर त्यांच्या भावाने एक लाख बत्तीस हजार रुपये पाठविले होते. परंतु काही तांत्रिक चुकांमुळे सदरील रक्कम ही त्यांच्या खात्यावर न येता अन्य व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाली. हे समजताच अगोदरच आर्थिक विवंचनेत असलेल्या मुजाहिद यांना मोठा धक्काच बसला. अशा संकटाच्या वेळी त्यांना आठवण झाली ती सदोदित मदतीला धावणारे राष्ट्रवादी रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंडे यांची! मुजाहिद यांनी जयवंत मुंडे यांना झालेला प्रकार सांगताच जयवंत मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता झाल्या प्रकाराची शहानिशा केली. ज्यांच्या नावे पैसे तांत्रिक चुकीमुळे जमा झाले त्यांच्याशी संपर्क साधून, त्यांचे प्रबोधन करून जमा रक्कम पून्हा मुजाहीद यांच्या बँक खात्यात वळविण्यात त्यांना यश आले. आपले पैसे पुनश्च आपल्या खात्यात जमा झालेले पाहून मुजाहिद त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी जयवंत मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कठीण प्रसंगात सहकार्य केल्याबद्दल आनंदित होऊन आभार मानले.
मुजाहीद यांच्यावरील प्रसंगाला धावून जाणारे जयवंत मुंडे कोण आहेत?
किल्ला येथील राहिवासी असलेले जयवंत मुंडे हे परिसरातील गोरगरीब जनतेच्या मदतीला सदोदित धावत जाणारे समाजसेवी व्यक्तिमत्त्व आहे. रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमांतून कोरोना काळात रोहा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जनसेवा अखंड सुरू आहे.