तळा येथील ग्रामीण रुग्णालय लवकरच होणार कार्यान्वित - आदितीताई तटकरे
तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आता रुग्णालयाचे हे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज या रुग्णालयाची पाहणी केली. या रुग्णालयाच्या बांधकामाची मुदत दि.31 ऑक्टोबर 2020 पर्यंत होती आणि आता या कामास दि.31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
या रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ 3319.10 चौरस मीटर असून याचे संपूर्ण बांधकाम हे आरसीसी पद्धतीत करण्यात आले आहे. आतापर्यंत या रुग्णालयासाठी 3 कोटी 31 लक्ष 56 हजार रुपये खर्च आला आहे. विविध बाह्य रुग्ण विभाग, कार्यालय, पॅथॉलॉजी, एक्स-रे रूम, मेडिकल स्टोअर, स्टोअर रूम आणि स्वच्छतागृह हे रुग्णालयाच्या पुढील भागात असून या भागाचे क्षेत्रफळ 1579.12 चौरस मीटर आहे. हे काम पुढील काही दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती संबंधितांनी पालकमत्र्यांना यावेळी दिली.
त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या मागील इमारतीचे काम अपूर्ण असून यामध्ये पुरुष विभाग 10 खाटा, महिला विभाग 10 खाटा, बाल आंतररुग्ण विभाग 10 खाटा, पोस्टमार्टम रूम, शवागार, प्रसूतीगृह, शस्त्रक्रिया गृह, स्वच्छतागृह असे विभाग आहेत. हे कामही दि.31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
रुग्णालयाच्या या बांधकामासाठी मुदतवाढ 24 महिने वाढवून दिली असून उर्वरित कामासाठी आणखी 18कोटी 84 लक्ष 12 हजार रुपयांचे अतिरिक्त अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रुग्णालयाच्या कामाची पाहणी केल्यानंतर या रुग्णालयाच्या पुढील इमारतीचा वापर अंदाजे पुढील चार महिन्यात सुरू करता येईल असा विश्वास पालकमंत्री कु. तटकरे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत श्री. चंद्रकांत रोडे, श्री.मंगेश शिगवण, श्री. महेंद्र कजबजे, सभापती सौ. अक्षता कदम आणि महिला व बालकल्याण सभापती सौ. गीता जाधव, स्थानिक अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.