गृहमंत्र्यांच्या राजिनामासाठी तळा भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन
तळा (संजय रिकामे) : मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा द्यावा यासाठी तळा भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रायगड जिल्हा पोलीस यांच्या मार्फत निवेदन तळा भाजपाच्या वतीने दि. 21/3/21 रोजी देण्यात आले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाच खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजिनामा दिला पाहीजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजिनामा घ्यावा अशी मागणी यावेळी तळा तालुका भाजपा अध्यक्ष कैलास पायगुडे यांनी केली.यावेळी तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे, शहर अध्यक्ष सुधीर तळकर, सरचिटणीस लोखंडे, रितेश मुंढे, गीतेश मेकडे, हर्षद ठक्कर, श्री. पाशिलकर आदि मान्यवर उपस्थित होते.