लिओमेट्रीक कडून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : रायगड जिल्हा परिषद शाळा पाटणूस येथील विद्यार्थ्यांना लिओमेट्रीक टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. हिंजवडी, पुणे या आयटी कंपनीकडून संचालक श्री. धनेश गाडेकर व श्री. राम खटके यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून उन्हाळी टोपी, पाणी बाॅटल आणि कोरोना विषयी काळजी घेण्यासाठी मास्क इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य मिळवण्यासाठी उपशिक्षक श्री. खटके सर यांनी प्रयत्न केले. मुख्याध्यापक श्री. राठोड सर यांनी शाळेच्या वतीने देणगीदारांचे आभार मानले.
रायगड जि.प.शाळा पाटणूस येथे इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग असून सध्या 17 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येथील शाळा सध्या बंद आहे, परंतु येथील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आणि शिक्षक गृहभेटीच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण नियमितपणे सुरु आहे. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून येथील शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून शालेय शिक्षणासाठी प्रयत्न करत असतात. त्यातीलच हा साहित्य वाटपाचा एक उपक्रम आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख मा.राऊत साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समिती अध्यक्ष जान्हवी म्हामुणकर, सदस्य काटकर, बंगाल, कामथेकर, जाधव उपस्थित होते.