पोलीसांच्या धडक कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात मटका-जुगार बंद!
नागरिक व महिला वर्गाकडून पोलीसांच्या कारवाईचे स्वागत
रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदा मटका, जुगार क्लब राजरोसपणे सुरू होते. दरम्यान, माणगांव तालुक्यातील ढालघर फाटा येथे बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून पोलीस प्रशासनाने हा अवैध जुगार क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील महिला वर्गाकडून केली जात होती. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही याप्रकरणी आवाज उठविला होता. त्यानंतर रायगड पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणी तातडीने दखल घेऊन सदरचे अवैध धंदे बंद केल्याने पोलीसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. तसेच अशा प्रकारचे अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद राहावेत व पुन्हा ह्या अवैध धंद्यांची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी नागरिक व महिला वर्गाकडून केली जात आहे.माणगांव तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या ढालघर फाटा येथील गॅरेजच्या पाठीमागील बाजूस बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असल्याचेही दिसून आले होते, या परिसरामध्ये या बेकायदा जुगार क्लबमुळे या परिसरातील महिला वर्गामध्ये संतापाची लाट पसरली होती व महिला वर्गाची याविरूद्ध मोर्चा काढण्याचीही तयारी होती.
या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले होते. दरम्यान, पोलीस अधीक्षक रायगड यांनी याप्रकरणी योग्य प्रकारे दखल घेतल्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाल्यामुळे पोलीसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.