जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ग्रामीण भागातील पुई गावची विद्यार्थिनी कु. श्रेया दळवी ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी
अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
रोहा (रविना मालुसरे) : शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचा हा विकास खुंटतो की काय? अशी भीती निर्माण झाली होती. तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची सोय केली. पुढे त्याच माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी कल्पकतेने वापर केला गेला. शहरी विभागाबरोबरच ग्रामीण भागांतील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा या माध्यमातून शोध घेतला गेला. त्याचा प्रत्यय आला तो पुई सारख्या छोट्याशा खेडेगावातील कु. श्रेया सुनील दळवी ही विद्यार्थिनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळू शकली यातून!
सविस्तर वृत्त असे की, शिक्षण क्षेत्रात रायगड व नवी मुंबई परिसरात अग्रेसर असलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीने कै. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आपल्या अंगभूत कौशल्याचे दर्शन घडवत कु. श्रेया सुनील दळवी या द .ग .तटकरे जूनियर कॉलेज कोलाड येथील विद्यार्थिनीने ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळविला .तर नागोठण्याची सानिया रणदिवे द्वितीय व पनवेल येथील वैष्णवी म्हात्रे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.कु. श्रेया दळवी तिला लहानपणापासूनच वक्तृत्वाची आवड होती. तिचे आजोबा सामाजिक कार्यकर्ते गंगाराम दळवी व वडील सुनील दळवी यांचेकडून तिला सदोदित प्रोत्साहन दिले जात आहे. पालक व गुरुजनांनी केलेल्या संस्कारांमुळेच आपण हे यश मिळवू शकलो असे कु. श्रेया प्रांजळपणे कबूल करते.
श्रेयाच्या यशाबद्दल प्राचार्य शिरीष येरुणकर, शिक्षक वर्ग, अनेक कुणबी समाज बांधव, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पुई ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.