राज्याच्या 2021-22 च्या अर्थसंकल्पात रायगड जिल्ह्यासाठी लक्षणीय उपलब्धी

तळा (संजय रिकामे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात रायगड जिल्ह्यासाठी लक्षणीय उपलब्धीचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे या गेले कित्येक दिवस प्रयत्नशील होत्या. 

रायगड जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहे. महाड एन.डी.आर.एफ. बेस कँप स्थापन करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील रेवस, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रेड्डी या 540 कि.मी. लांबीच्या सागरी मार्गाच्या कामासाठी 9 हजार 573 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्याची ही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क उभारण्यात येणार आहे, जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथे पथदर्शी तत्वावर कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. तसेच शासकीय आदिवासी आश्रमशाळांचे मॉडेल निवासी शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. पर्यटन विकासासाठी जेट्टी, काशिद, ता. मुरुड यांचा विकास करण्यात येणार आहे. अष्टविनायक  तीर्थक्षेत्र महड व पाली यांच्या विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मॉडेल आश्रमशाळा (आदिवासी विभाग), शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बाळशास्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना राबविण्यासाठी रु.10 कोटी तरतूद करण्यात आली आहे. महसूली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान अत्याधुनिक पार्क स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात राज्य संग्रहालय निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतची स्थळ निश्चितीही लवकरच करण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त महिला विकासाच्या विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेमध्ये 1 टक्के मुद्रांक शुल्क सवलत देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थींनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सवलत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले परिवहन योजनेतर्गत देण्यात येणार आहे. संत जनाबाई सामाजिक कल्याण व सुरक्षा योजनेमार्फत घरकाम करणाऱ्या महिलांसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलीस दल-महिला गट, जिल्हा नियोजन समिती करिता 3 टक्के राखीव निधी, विशेष पोस्को न्यायालये-एकूण संख्या- 103 अशा उपलब्धीही अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे.

Popular posts from this blog