नगरविकास खात्याकडून तळा शहरातील पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता

तळा (संजय रिकामे) : तळा शहराला वाढीव पाणी पुरवठा योजना वावे धरणातून मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला अखेर शासनाने तत्वता मान्यता दिली असल्याचे अधिकृत पत्र नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी महाड पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहरप्रमुख राकेश वडके यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवक, शिवसैनिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले अनेक वर्षे लाल फितीत अडकलेल्या पाणी पुरवठा योजनेला संघटीतपणाने केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस प्रशासकीय तत्वता मान्यता मिळून शहरात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सदर योजना महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पूर्ण केली जाणार असून या योजनेसाठी ९ कोटी ४९ लक्ष रू. निधीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात या योजनेचे भुमीपूजन करून सदर योजना लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे प्रतिक्षेत असणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचा लाभ तळा शहरवासियांना लवकर होईल अशी अपेक्षा आहे. वावे लघु पाटबंधारे धरणातून पाणी शहरातील किल्ल्याजवळ, त्याचप्रमाणे जल शुद्धीकरण प्लँन्ट, साठवण टाकी, सर्व पाईपलाईन अशी कामे होणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे. तळा नगरपंचायत निवडणुक तोंडावर असताना काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने तळा शहरात करोडो रुपयांच्या विकासकामांचे भुमीपुजन आणि उद्घाटन केले. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा योजनेस मंजुरी आणुन राष्ट्रवादी काँग्रेसवर मात करत निवडणुकीत आपले पारडे जड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नगरपंचायत निवडणुक महाविकास आघाडी होणार की स्वबळावर लढणार हे येणारा काळच ठरवेल तूर्तास नगरपंचायतीवर शिवसेनेने मजबूत पकड घेतली असून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

Popular posts from this blog