छत्रपती करियर अकॅडमी माणगांव तर्फे किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम
माणगांव (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे आर्मी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या छत्रपती करियर अकॅडमीच्या संस्थापिका सौ. माधुरी निवास साबळे, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत किल्ले रायगडावर श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविली.
छत्रपती करियर अकॅडमीतर्फे दरवर्षी अशा प्रकारचे समाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी शिवजयंतीच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी किल्ले रायगडावरील हत्ती तलाव, टकमक टोक, भवानी माता मंदीर, समाधी मंदीर, राणी महल, होळीचा माळ या ठिकाणांवर सुमारे ७० विद्यार्थ्यांनी कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावून स्वच्छता मोहीम राबविली.
त्याचप्रमाणे शिवजयंतीचे औचित्य साधून येत्या १ मार्च ते १५ मार्च २०२१ या कालावधीत छत्रपती करियर अकॅडमीतर्फे मोफत आर्मी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तरी इच्छुक सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती करियर अकॅडमीच्या संस्थापिका सौ. माधुरी निवास साबळे यांनी केले आहे.